Pune MIT Accident : MIT महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृ्त्यू, पाच जखमी
Pune MIT Accident : पुण्यातील एमआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थ्यांनी जागीच प्राण सोडले तर अपघातात पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Pune MIT Accident : पुण्यातील एमआयटीमध्ये (MIT) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण (pune accident) अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील नारायणगावमध्ये एक्सयूव्ही 300 गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या असलेल्या दुकानाला धडकली आणि गाडी पलटी होऊन दोघांनी जागीच प्राण सोडले.
रचित मेहता आणि गौरव लालवानी अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. सासवड कापूरहोळ रस्त्यावर काल पहाटे हा अपघात झाला. भरधाव वेगाने असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुकानाला जाऊन धडकली आणि पलटी झाली होती. या अपघातात जखमींमध्ये तीन मुलींचा समावेश आहे.
अपघातानंतर गावकऱ्यांनी मदत करुन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केलं तर पाच जणांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. अपघात झालेले विद्यार्थी हे पुण्यातील एमआयटी कॉलेजचे असून ते विविध विभागात शिकत होते. सासवड पोलिसांनी फेटल अपघात दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील हे महाविद्यालयीन विद्यार्थी देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी पुरंदर तालुक्यातील नारायणगावमध्ये त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली. त्याच्या या अपघातामुळे पाचही जणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे असे अपघात होणार नाही शिवाय गाडीचं नियंत्रण सूटणार नाही याबाबत काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अपघाताचं सत्र संपणार तरी कधी?
पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता. एका कॉन्क्रिट मिक्सर ट्रकने एकाच वेळी चार रिक्षांना धडक दिली होती. या भीषण अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले होते. रिक्षात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. कॉन्क्रिट मिक्सर ट्रक खाली अडकलेल्या रिक्षा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या होत्या. माहितीनुसार, हा अपघात सकाळी सहाच्या सुमारास घडला होता. सोलापूरवरुन भरधाव वेगाने हा कॉन्क्रिट मिक्सर ट्रक येत होता. आडवी आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी मिक्सर ट्रकने वळण घेतलं. त्यानंतर ट्रक चालकाचा ताबा सुटला. ट्रकने या परिसरातील मोठ्या झाडांना धडक दिली आणि हडपसरच्या गाडीतळ परिसरातील उभ्या असलेल्या रिक्षांना कॉन्क्रिट मिक्सर ट्रक धडकला. या धडकेत रिक्षांचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर कॉन्क्रिट मिक्सर ट्रकचा चालक फरार झाला होता..