Supriya Sule: केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय? गजा मारणे गँगची मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण, सुळेंनी व्यक्त केला संताप
Supriya Sule: मारणेच्या टोळीतील गुंडांनी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिवजयंतीच्या दिवशी घडली आहे.

पुणे: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिवजयंतीच्या दिवशी घडली आहे. कोथरूड परिसरामध्ये गाडीला धक्का लागल्यामुळे वाद झाला आणि त्यातून मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या आणि आय टी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना मारणेच्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे. देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असता गजानन मारणे टोळीतील बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी गाडीचा धक्का लागला असं म्हणून जोग यांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये जोग यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर आता विरोधकांनी या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कायदे सुव्यवस्था रुळावर आणावा अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधीची सोशल मिडिया पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावा असं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंची सोशल मिडिया पोस्ट काय?
सुप्रिया सुळेंची आपल्या पोस्टमध्ये लिहलंय, "पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गेली काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे. भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करतो".
पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.… https://t.co/rH7Wzy9I68
— Supriya Sule (@supriya_sule) February 21, 2025
नेमकं काय घडलं ?
शिवजयंतीच्या दिवशी (19 फेब्रुवारी) कोथरूड परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी चार जणांनी बाईकवरुन जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. त्यावेळी त्या चार जणांकडे देवेंद्र जोग रागाने बघितलं म्हणून तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरोधात BNS कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन आरोपींना कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. तर एक आरोपी, जो गुंड गज्या मारणेचा भाचा आहे, तो फरार आहे.हे चौघेजण कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील आहेत.अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार (गजाचा भाचा) असे आरोपींचे नाव आहेत. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
व्हिडीओ कॉलवरून मोहोळांनी देवेंद्र जोग यांची केली विचारपूस
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ कॉल करून देवेंद्र जोग यांची विचारपूस केली असल्याची माहिती आहे. देवेंद्र जोग हे मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयात सोशल मीडिया क्यांपेनिंगच्या कामात मदत करतात. पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून चौथा बाबू पवार हा फरार झाला आहे. बाबू पवार हा गुंड गजानन मारणेचा भाचा आहे. कोथरूड परिसरात यामुळे भीतीचे वातावरण आहे.























