Maval Loksabha : नशीब माझं, मला बारणे ओळखायला लागले, प्रचाराची सांगता करताना संजोग वाघेरेंची खोचक टीका
विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पिंपरी-चिंचवडचे पहिले व माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत आहे.
Maval Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (11 मे) थंडावणार आहेत. आज अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. मावळ लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे अखेरच्या दिवशी प्रचारासाठी घराबाहेर पडले आहेत. आज शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटलांची रॅली, पदयात्रा आणि सभा सुद्धा होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारणे मला ओळखायला लागले, हेच माझं नशीब समजतो. अशी खोचक टीका वाघेरे यांनी केली.
मावळमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे थेट लढत
दरम्यान, मावळमधून शिवसेनेनं 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवल्यापासून 2019 पर्यंत विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. तथापि, यावेळी दोन शिवसेना आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरंग बारणे आणि दुसरे उद्धव ठाकरे, ज्यांचे उमेदवार संजोग वाघेरे आहेत. या दोन उमेदवारांमधील लढाई केवळ खासदार होण्यासाठी नसून या मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने आहेत आणि या दोघांपैकी खरी शिवसेना कोणाची, हे पाहण्याची आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची बाजू घेणारे विद्यमान खासदार बारणे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पिंपरी-चिंचवडचे पहिले व माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत आहे.
मावळ मतदारसंघात कोणाची किती ताकद?
मतदारसंघात सहा विधानसभांचा समावेश आहे, त्यापैकी तीन पुणे जिल्ह्यातील येतात (पिंपरी, चिंचवड आणि मावळ) आणि रायगड जिल्ह्यांतर्गत उर्वरित उरण, पनवेल आणि कर्जत मतदारसंघ येतात. महायुतीचा पाठिंबा असलेल्या बारणे यांना रायगड जिल्ह्यातून तीन विधानसभेचा फायदा होऊ शकतो पनवेल, भाजपचे प्रशांत ठाकूर प्रतिनिधित्व करत आहेत. भाजप समर्थक अपक्ष महेश बालदी यांच्या ताब्यात उरण आहे आणि कर्जत शिवसेनेचे महेश थोरवे यांच्याकडे आहे. पुणे जिल्ह्यातील उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे असलेले मावळ, भाजपच्या अश्विनी जगताप यांच्याकडे असलेले चिंचवड आणि राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्याकडे असलेले पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादीने बारणे यांच्या विरोधात अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांना उमेदवारी दिली पण त्यांना पराभव पत्करावा लागला. अजित यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्यानंतर त्यांनी बारणे यांना पाठिंबा दिला. पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना बारणे यांचा प्रचार करण्याचे आणि भूतकाळातील मतभेद विसरून जाण्याचे निर्देश दिले होते. वंचित बहुजन आघाडी देखील महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला 75,904 मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने यावेळी माधवी जोशी यांना उमेदवारी दिली आहे. पुणे जिल्ह्यात, तळेगाव, तळवडे, उर्से आणि टाकवे बुद्रुक यांसारख्या औद्योगिक केंद्रांमधून काही कंपन्या स्थलांतरित झाल्यामुळे तरुण मतदार चिंतेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या