राष्ट्रवादीच्या दुसऱ्या आमदाराचा श्रीरंग बारणेंना विरोध, पार्थ पवारासांठी फिल्डिंग, अजित पवार काय निर्णय घेणार?
Maval Lok Sabha constituency : राष्ट्रवादीचा आधी बारणेंच्या उमेदवारीला विरोध, आता पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी महायुतीत गुंता वाढला.
मावळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) सहा जानेवारी रोजी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये (Maval Lok Sabha constituency) जाहीर सभा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे बोलले. पण मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा युतीमध्ये कुणाकडे जाणार? याचा तिढा वाढलाय. मावळ लोकसभा मतदारसंघातील दोन आमदारांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. आधी सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीला थेट विरेध दर्शवला होता. आता आमदार अण्णा बनसोडे यांनी पार्थ पवार (Parth pawar)यांना मावळमधून उमेदवारी मिळावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तेढ निर्माण झाल्याचं दिसतेय. अजित पवार (Ajit pawar)आता काय निर्णय घेणार? याकडे मावळ मतदारसंघाचे लक्ष लागलेय.
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी पुन्हा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी केली आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर आता बनसोडेंनी थेट पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांची सभा होण्यापूर्वीचं मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत अधिकचं गुंता वाढताना दिसतायेत.
मावळ राष्ट्रवादीलाच मिळावा -
सुनील शेळके यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा, असे तुम्हालाही वाटतेय का? अण्णा बनसोडे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघ ज्या पक्षाला जाईल त्या पक्षाचे काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणीस असतील हे तिन्ही महायुतीमध्ये काम करत असताना तिन्ही पक्षाच्या कॉमन मीटिंग लावण्याचे काम आता गेल्या दोन-चार दिवसापासून होत आहे. त्यामुळे पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये जो निर्णय होईल, त्या निर्णयानुसार जो उमेदवार ठरेल त्या उमेदवाराचा प्रचार आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मनापासून करणार आहोत.
पार्थ पवारांनी पुन्हा निवडणूक लढवावी -
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गेल्या वेळेला इथूनच निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवावी, अशी तुमची इच्छा आहे का? यावर बोलताा अण्णा बनसोडे म्हणाले की, पार्थ पवार यांनी इथून निवडणूक लढवावी. पार्थ पवार यांनी मागच्या वेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, खरं तर त्या टायमाला पार्थ पवार हे नवीन होते. पण त्यावेळेस त्यांनी जे काम केलं होतं, त्या दिवसापासून आज गेली पाच वर्षापर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या ते संपर्कात आहेत. पक्षांनी जर त्यांना उमेदवारी दिली तर नक्कीच ते निवडून येतील, अशी माझी खात्री आहे. पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी अण्णा बनसोडे यांनी मागणी केली आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्रमध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे. राज्यामध्ये काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील तो निर्णय मला लागू आहे, असे अण्णा बनसोडे म्हणाले.
महायुतीमध्ये तेढ वाढला -
मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आहेत. ते शिवसेना (शिंदे गट) मधून दोन वेळा खासदार राहिलेत. यावेळेस तिसऱ्यांदा ते मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना महायुतीमधूनच विरोध होत असल्याचं दिसतेय. आमदार सुनील शेळके यांच्यानंतर आता आमदार अण्णा बनसोडे यांनीही श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. महायुतीसाठी मावळ मतदारसंघाचा तिढा वाढलेला दिसतोय.