Devendra Fadnavis: BKCतील दसरा मेळाव्याने खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Politics Devendra Fadnavis: बीकेसीतील गर्दीने खरी शिवसेना कोणाची आहे हे दाखवून दिले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं.
Maharashtra Politics Dasara Melava: खरी शिवसेना कोणाची हे शिंदेच्या दसरा मेळाव्यातील (Dasara Melava) गर्दीने दाखवून दिली असल्याचे प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणात शिमगा सोडून काही नसते आणि शिमग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, नागपुरात असल्याने मी दोन्ही भाषणं ऐकलेली नाहीत. पण मी भाषणांचा थोडा थोडा सारांश ऐकला आहे. मी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देणार नाही. याचे कारण म्हणजे शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची क्षमता ही शिवाजी पार्क मैदानाच्या दुप्पट आहे. एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणाची आहे. हे दाखवून दिले. विधानसभा, मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर विचारले असता, विधानसभेवर भगवा फडकणार असून हा भगवा भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना युतीचा फडकणार असल्याचे म्हटले
उद्धव ठाकरे यांना सल्ला
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना भाजपशिवाय स्क्रिप्टशिवाय भाषण करण्याचे आवाहन केले होते. त्यावरही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी आता भाषण लिहून देण्यासाठी नवीन माणसं नेमावी असा सल्ला दिला. उद्धव ठाकरे यांची तीच भाषणे सारखी ऐकून आम्हाला कंटाळा आला असल्याचे फडणवीसांनी म्हटले. शिवसेनेचा मूळ विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा विचार स्वीकारल्याने अनेकांनी त्यांची साथ सोडली असल्याची टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विकासाच्या मुद्यावर भर दिला. आम्ही काय केले आहे, भविष्यात काय करणार आहोत, याबाबत त्यांनी भाषणात स्पष्टता ठेवली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे पक्षप्रमुखांचे भाषण करत होते, असेही फडणवीस यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: