बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर : एकनाथ शिंदे
Shivsena Dasara Melava 2022 : गद्दारी झाली.. ती 2019 ला गद्दारी झाली. ज्या निवडणुका आपण लढवल्या त्यानंतर जी आघाडी केली. त्याचवेळी गद्दारी झाली.
Shivsena Dasara Melava 2022 : बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघाती टीका केली. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. खोके आणि गद्दार यावरुनही त्यांनी विरोधकांना सुनावलं. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
गद्दार आणि खोक्यांच्या आरोपावर काय म्हणाले एकनाथ शिंदे?
वारसा हा विचारांचा असतो. तो जपायचा असतो. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे. त्यामुळे विचारांचे पाईक आणि शिलेदार कोण आहे? हे महाराष्ट्राला समजले आहे. आम्हाला दोन महिन्यापासून गद्दार आणि खोके तिसरा शब्दच नाही...बाकी तर बोला... पण काय केलं नाही तर बोलणार काय? त्यामुळे होय.. गद्दारी झाली आहे. शंभर टक्के बरोबर आहे. पण गद्दारी झाली.. ती 2019 ला गद्दारी झाली. ज्या निवडणुका आपण लढवल्या त्यानंतर जी आघाडी केली. त्याचवेळी गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली. हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली. या राज्याच्या मतदाराशी गद्दारी केली. ज्या लोकांनी शिवसेना-भाजप युती म्हणून निवडून दिलं. त्यांनी ठरवलं होतं, महाविकास आघाडीचं सरकारनं नाही, भाजप-शिवसेना युतीचं सरकार होईल.. निवडणुकीमध्ये एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो, दुसऱ्या बाजूला नेरेंद्र मोदी यांचा फोटो लावला होता. लोकांनी तुम्हाला युती म्हणून निवडून दिलं होतं. युतीचं सरकार स्थापन होईल, अशी लोकांची आपेक्षा होती. पण तुम्ही लोकांच्या मताला नाकारलं. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही बेईमानी केली आहे. तुम्ही विश्वासघात केलाय. तुम्ही गद्दारी केली. आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणताय. आम्ही केलेली गद्दारी नाही.. तर गदर आहे... गदर म्हणजे क्रांती, उठाव होय.. महाराष्ट्रातील जनतेनं जाणलेलं आहे. त्यामुळे आम्ही गद्दार नाही, बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. हे आम्ही अभिमानाने आणि छातीठोकपणे सांगतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाली आहे. तुम्ही तर बापाचे विचार विकले. तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करायची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलंदाजी दिली. मग खरे गद्दार कोण? जनेतला समजले आहे. म्हणून जनता आमच्यासोबत आहे. किती मोठ्या प्रमाणात लोक आलेत. नागरिकांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत.
मी कुणावर टीका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही कायम आहोत. आमचे विचार बदलणार नाहीत, बदलले नाहीत. तुम्ही मात्र भरकटलात. सत्तेसाठी लाचार झालात. बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा पुरस्कार केला. पण हिंदुत्ववादी राजकारण करत चूक केली, असे राज्याच्या सर्वेच्च सभागृत तुम्ही सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी...? बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती? 25 वर्ष युतीत आम्ही सडलो. हे जाहीरपणे सांगताना तुम्हाला काहीच वाटले नाही का?, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.