Pune Old Pension Schem : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांचा एल्गार
सरकारी कर्मचाऱ्यांचा पुण्यात भव्य (Old Pension Scheme) मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
Pune Old Pension Schem : सरकारी कर्मचाऱ्यांचा पुण्यात भव्य (Old Pension Scheme) मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. मोठमोठ्याने घोषणाबाजी करत हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
जुनी पेन्शन लागू करा, यासाठी मागील तीन दिवसांपासून राज्यभर संप सुरु आहे. आज संपाचा चौथा दिवस आहे. या संपामुळे राज्यातील अनेक विभागातील यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मागण्या मान्य करा यासाठी पुण्यात हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हापरिषदेच्या नवीन इमारतीपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. यात सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
मोर्चात महिलांचा मोठा सहभाग
या मोर्चात सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. त्यात सगळे मोठ्याने घोषणाबाजी करत आहेत. तर अनेकांनी हातात होर्डिंग घेतलेले आहेत. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आणि एकच मिशन, जुनी पेन्शन, अशा घोषणा देण्यात आल्या.
कर्मचारी संपावर ठाम
राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आजही संपावर आहेत. पुणे जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेवर संपाचा मोठा परिणाम झालेला मागील तीन दिवसांपासून दिसून आला आहे. सगळ्या विभागाच्या यंत्रणा कोलमडल्या आहेत. सरकारी आणि निमसरकारी कामकाज संथगतीने सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण 68 हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 32 विभागातील कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. त्यात बांधकाम विभाग, महसूल विभाग, कृषी विभागातील अनेक कामे रखडली. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असताना कर्मचारी संपावर ठाम आहेत.
आरोग्य विभागावर संपाचा जास्त परिणाम
या सगळ्या संपाचा सर्वात जास्त परिणाम आरोग्य विभागावर पडला आहे. अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावात रुग्णालय आहे. गावात पर्यायी रुग्णालय नसल्याने अनेक लोक या रुग्णालयावर अवलंबून असतात. मात्र या रुग्णालयातील कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण पुण्यात दाखल होत आहेत. पुण्यातही उपचारासाठी डॉक्टर मिळत नसल्याने नागरिकांना रुग्णांना रस्त्यावर घेऊन उभं राहावं लागत आहे. त्यामुळे संप करा मात्र रुग्णांचा जीव जाईपर्यंत अंत पाहू नका, अशा भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहे.