...त्यामुळे पुण्याच्या माजी शिवसेना अध्यक्षांना लोणावळा पोलिसांनी पाठवली नोटीस
Shiv Sena : शिवसेनेचे पुण्याचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिन्द्र खराडे यांना लोनावळा पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
पुणे : पुण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिन्द्र खराडे यांना लोनावळा पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून खराडे यांनी एक मेसेज व्हाट्सअँप ग्रुपवर टाकला होता. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सी.आर.पी.सी 149 प्रमाणे खराडे यांना नोटीस पाठवली आहे.
शिवसेनेतील जवळपास 40 आमदारानी बंडखोरी करून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा दोन गटात शिवसैनिक विभागले गेले आहेत. त्यामुळे या दोन गटात शाब्दिक चकमक देखील पहायला मिळत आहे. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना सोशल मीडियावर गद्दार असे संबंधण्यात येत आहे. पुण्यातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे गटाशी घरोबा केल्यामुळे मावळ तालुक्यातील शिवसेनेत संघर्ष निर्माण झालाय. यातूनच खराडे यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत एक मेसेज व्हट्सअॅप ग्रुपमध्ये टाकला होता. त्यामुळे खराडे यांना पोलिसांनी नोटीस पाटवली आहे.
नोटीसीमध्ये काय म्हटले आहे?
लोणावळा पोलिसांनी खराडे यांना पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, "आपण मावळ तालुक्यातील कट्टर शिवसैनिक या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये प्रक्षोभक मेसेज पाठविला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे . तरी आपणाकडून आणि आपल्या हस्तकाकडून कोणतेही कृत्य घडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. भविष्यात तुमच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अशा प्रकारचे कृत्य झाल्यास तुमच्याविरूध्द् प्रचलित कायदयानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. तसेच ही नोटीस तुमच्याविरूद् पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल यांची नोंद घ्यावी.
काय होता मेसेज?
सध्य परिस्थितीमध्ये गद्दारांच्या चुकीच्या भूमिकेनंतर मावळमध्ये शिवसैनिकांचा उद्रेक झाला. त्यानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीचे फलित योग्य दिशेने जात असताना अचानक ग्रामीण, शहर, अशी चर्चा सुरू झाली. संघटनेमध्ये लोकप्रतिनिधींना मान सन्मान देणे क्रमप्राप्त आहे. परंतु तो मानसन्मान अती झाल्यामुळे आणि गद्दार लोकप्रतिनिधी डोक्यावर बसवल्यामुळे त्यांनी डोक्यावर बसवणाऱ्यांना डोक्यावर आपटून शेण खाल्ले. त्यामुळे कडवट कट्टर हे शब्द मला चांगलेच माहिती आहेत आणि ते जुन्या शिवसैनिकांना सुद्धा चांगले माहिती आहेत. त्यामुळे ग्रुपवर जास्त आपापसात वादविवाद करण्यापेक्षा जास्त फडफड करण्यापेक्षा आता फक्त आणि फक्त एकसंध मावळ विधानसभा शिवसेना असणे गरजेचे आहे. यापुढे यामागे केलेल्या चुका आणि गटबाजी शिवसैनिक म्हणून तालुक्यातील शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. आता फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि शिवसेना यापेक्षा दुसरे काही नाही. व्यक्तिगत महत्त्वकांक्षांना सध्याच्या या कठीण काळामध्ये पूर्णपणे तिरांजली. डॉ. विकेश मुथा, दत्ता केदारी आणि राक्षे यांनी टाकलेला फोटो म्हणजे हनुमंत ठाकर यांनी प्रथम आपल्या मोबाईलचा डीपी बदलून गद्दार माती चोराचा फोटो काढावा. जे शिवसैनिक वडेश्वरच्या बांडगुळाच्या ग्रुप मध्ये, कारल्याच्या बांडगुळाच्या ग्रुप मध्ये अजून आहेत त्यांनी प्रथम तो ग्रुप सोडावा. मावळ शिवसेनेचा यज्ञ शिवसैनिकांच्या उभारी मुळे महायज्ञ कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत.