Pune Crime : पुण्यात आमदाराच्या गावातील मुलावर बिबट्याचा हल्ला; दबा धरून बसलेल्या बिबट्यानं थेट अंगावर झेप घेतली
Pune Crime : सातत्याने जुन्नर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये बिबट्यांचे मनुष्य प्राण्यांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याचे माणसांवरील हल्ले सुरुच आहेत. आमदार अतुल बेनके यांचं मूळ गाव असलेल्या हिवरेजवळील भोरवाडीमधील 17 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भोरवाडीत घडली. सातत्याने जुन्नर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये बिबट्यांचे मनुष्य प्राण्यांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली
बिबट्याने केलेल्या हल्ल्याबाबत माहिती अशी की, यश संदीप भोर (वय 17, रा. भोरवाडी, हिवरे) हा बारावीमध्ये शिकत असून रविवारी रात्री साडेआठ वाजता घरातील वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे मोबाईलच्या टॉर्च प्रकाशात घरातून बाहेर चालला होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. मात्र, तत्काळ यशने विरुद्ध बाजूला पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाठमोरा झालेल्या यशच्या पोटरीवर बिबट्याने पंजा मारला. बिबट्याचा आवाज व मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर तेथे समीर भोर व अन्य एकाने ते पाहून आरडाओरडा केल्याने बिबट्या तिथून पसर झाला. बिबट्याच्या हल्ल्यात हा मुलगा जखमी झाला. त्याला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
आज (17 जून) दुपारी ग्रामीण रुग्णालयात भोरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते शरद बिबवे, ग्रामपंचायत सदस्य शरद भोर, ट्रस्टचे विश्वस्त संजय चासकर, जखमी युवकाचे वडील संदीप गजानन भोर व ग्रामस्थ यशला भेटण्यासाठी पोहोचले. जखमी मुलाच्या नातेवाईकांनी वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसीव केला नाही.
विटभट्टीवरुन तीन वर्षीय चिमुकली बेपत्ता
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील ओझर रोडवरील धालेवाडी येथे विटभट्टीवरुन तीन वर्षीय चिमुकली रात्रीच्या अंधारात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धालेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला झाला का याबाबत शोधकार्य सुरु आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. धालेवाडी परिसरात यापूर्वी बिबट्याचे झाले आहेत. अशातच धालेवाडीत वीटभट्टीवर काम करणारे मजुर वास्तव्यास आहेत. दरम्यान, वीटभट्टीवर वास्तव्यास असताना तीन वर्षीय चिमुकली रात्रीच्या अंधारात बेपत्ता झाली असून चिमुकलीचा शोध सुरु आहे. चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला झाला का? याबाबत रेस्क्यू करण्यासाठी जुन्नर पोलिसांनी वनविभागाला पाचारण केलं आहे. सध्या चिमुकलीचा शोध युद्ध पातळीवर सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या