(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll Election : कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले....
पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार (Chinchwad bypoll election) संघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Chinchwad bypoll election) पोटनिवडणूक बिनविरोध होईल याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शंका व्यक्त केली आहे. ते पुण्यात (Pune) बोलत होते. सोमवार-मंगळवारी मुंबईत बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.
दोन्ही पोटनिवडणुका लढवण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा : अजित पवार
दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांची आज भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत. तसंच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे, असं ते म्हणाले.
... तर या नावांची चर्चा
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहे. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात नाना काटे (Nana Kate), भाऊसाहेब भोईर (Bhausahen Bhoir) यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आता जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटे (rahul Kalate) यांनी 2019 च्या विधानसभेच्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या नावामध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे.
पक्षाची ताकद जास्त असलेल्यांना इतरांनी मदत करा
महाविकास आघाडीमध्ये काही नवीन प्रश्न उभे राहतील, अशी वक्तव्य करणार नाही. सत्यजीत तांबे यांच्याबाबत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात बोलले आहेत. जे घडलं ते पुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, असं अजित पवार म्हणाले.