Pankaj Khelkar Death : पंकज खेळकरच्या जाण्याने विश्वास नांगरे पाटील हळहळले, म्हणाले, युवा मंडळी ब्रेकिंग पॉईंटवर उभी आहे!
IPS Vishwas Nangare Patil : पुण्यातील पत्रकार पंकज खेळकर यांचे सोमवारी (12 मार्च) रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Pankaj Khelkar Death : पुण्यातील पत्रकार पंकज खेळकर ( Pankaj Khelkar) यांचे सोमवारी (12 मार्च) रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. 'इंडिया टुडे', 'आज तक' आणि 'मुंबई तक'चे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. त्यांच्या निधनावर पत्रकारितेसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातही दु:ख व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. नांगरे पाटील यांनी एक पोस्ट लिहिली असून युवा मंडळी ब्रेकिंग पॉईंटवर उभी असल्याचे म्हटले आहे. विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangare Patil) यांच्या पोस्टची चर्चा सध्या सुरू आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिवंगत पत्रकार पंकज खेळकर यांना आदरांजली वाहताना सध्याच्या दगदगीच्या धावपळीबद्दल भाष्य केले आहे. नांगरे-पाटील यांनी म्हटले की, ब्रेकिंग न्यूज च्या नादात तरणी ताठी युवा मंडळी ब्रेकिंग पॉईंट वर उभी आहेत. स्पर्धा जीवघेणी आहे आणि त्या स्पर्धेत टिकण्याच्या नादात आरोग्याची अपरिमित हानी झालेली त्यांच्या लक्षातही येत नाही. थांबायला सवड नाही, स्वतःसाठी वेळ नाही आणि लक्षात येते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. प्राईम टाइम च्या नादात आयुष्यातील प्राईम गोष्टी सोडून गेलेल्या असतात आणि मग बहुतांशी जणांचं तारुण्य खस्ता खाण्यात, प्रौढत्व पश्चातापात आणि म्हातारपण कुढत राहण्यात निघून जात याकडे नांगरे पाटील यांनी म्हटले.
त्यांनी पुढे म्हटले की, हे चित्र कमी जास्त फरकानं धावपळीच्या सगळ्या क्षेत्रात दिसून येते. म्हणून थोडा थांबा घ्यावा, सभोवतालची वनराई पाहावी, मुलांच्या आणि वृद्धांच्या सोबत रमावं, तहान लागली असेल तर पाणी प्यावं, भूक लागली असेल तर चटणी भाकर खावी आणि थकवा आला असेल तर थोडी डुलकी काढावी असेही नांगरे पाटील यांनी म्हटले.
पंकज खेळकर यांच्या निधनाने शोककळा
पंकज खेळकर हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिते कार्यरत होते. पुण्यातील पाषाण येथील राहत्या घरी सोमवारी रात्री पंकज खेळकर यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांनी अनेक वर्ष इंडिया टुडे या वृत्तसमूहाचे पुणे प्रतिनिधी म्हणून काम केले होते.