उंची वाढवण्यासाठी चक्क जॅक लावून उचलला बंगला!
'पुणे तिथे काय उणे' याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. पंक्चर झाल्यावर गाडीला जॅक लावून दुरुस्ती करणं हे खूप साहजिक आहे. मात्र पुण्यात दुरुस्तीसाठी जॅक लावून चक्क बंगलाच उचलण्यात आला आहे.
पुणे : 'पुणे तिथे काय उणे' याची पुन्हा एकदा प्रचिती आली. पंक्चर झाल्यावर गाडीला जॅक लावून दुरुस्ती करणं हे खूप साहजिक आहे. मात्र पुण्यात दुरुस्तीसाठी जॅक लावून चक्क बंगलाच उचलण्यात आला. बंगल्याची उंची वाढवण्यासाठी हे जॅक लावण्यात आले आहेत. 2000 स्क्वेअर फुटांच्या बंगल्याला तब्बल 250 जॅक लावून उचलण्यात आलं.
पुण्यातील बी. टी. कवडे रस्ता येथील तारदत्त कॉलनीतील 'भारद्वाज' नावाचा बंगला आहे. घरासमोर वर्षानुवर्ष रस्त्याची दुरुस्ती होत राहिली, त्यामुळे रस्त्याची उंची वाढली. पण बंगल्याची उंची रस्त्याच्या तुलनेत कमी झाल्याने पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात घुसत होते. दरवर्षीच्या त्रासाला मालक वैतागले होते. त्यामुळे त्यांना बंगल्याची उंची वाढवून रस्त्याच्या लेव्हलला आणायची होती. या समस्येपासून सुटकेसाठी ते पर्याय शोधत होते.
बंगल्याची उंची वाढवायची म्हणजे अनेक समस्या होत्या. त्यामुळे बंगल्याच्या बांधकामालाही धोका निर्माण होऊ शकत होता. घरमालकांनी अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांना घराची उंची वाढवण्याबाबतच्या 'हाऊस लिफ्टिंग' पर्यायाबाबत माहिती मिळाली.
हाऊस लिफ्टिंग पद्धतीने बंगल्याची उंची वाढवण्याचा निर्णय 'भारद्वाज' बंगल्याच्या मालकांनी घेतला. त्यासाठी हरियाणाच्या एका ठेकेदाराला त्यांनी हे काम दिलं. 2000 स्क्वेअर फुटांच्या बंगल्याची चार फूट उंची वाढवण्यासाठी तब्बल 250 जॅक लावण्यात आले. हाऊस लिफ्टिंगची पद्धत फार ओळखीची नसल्याने नागरिकांनाही याबाबत कुतूहल वाटत आहे.
बंगल्याच्या उंची वाढवण्याचं काम तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. पाया कापून शेकडो जॅकच्या मदतीने बंगला उचलण्यात आला असून गॅपमध्ये विटा रचून बंगल्याची उंची वाढवण्यात येणार आहे. अशाप्रकारे बंगल्याची उंची वाढवण्याचा हा पुण्यातील पहिलाच प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे.