Siddhant Patil: आम्हाला माहितीये, तो जिवंत आहे पण दूतावास निष्ठूर आहे; सिद्धांतच्या मामाचे गंभीर आरोप
अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील सिद्धांत पाटीलची शोधमोहीम अखेर आठ दिवसांनी थांबली. सिध्दांतचा मृत्यू झाला असण्याची शक्यता गृहीत धरली असल्याचे ग्लॅशियर नॅशनल पार्कने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
पुणे : अमेरिकेतील ग्लॅशियर(Glacier National Park) राष्ट्रीय उद्यानात बेपत्ता झालेल्या पुण्यातील सिद्धांत पाटीलची शोधमोहीम अखेर आठ दिवसांनी थांबली. सिध्दांतचा मृत्यू झाला असण्याची शक्यता गृहीत धरली असल्याचे ग्लॅशियर नॅशनल पार्कने आपल्या पत्रकात म्हटले आहे. मात्र यावर सिद्धांतच्या कुटुंबियांचा विश्वास बसत नाही आहे. त्यांनी दुतावासाकडे पहिल्या दिवसापासून मदत मागितली मात्र त्यांच्याकडून हवी तशी मदत मिळत नसल्याचा गंभीर आरोप सिद्धांतचे मामा प्रितेश चौधरी यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
मागील आठ दिवसांपासून सिद्धांतचा अमेरिकेतील ग्लॅशियर नॅशनल पार्कमध्ये(Glacier National Park) शोध सुरु होता. सिद्धांत ज्या दरीत पडला ती दरी खोल आहे आणि घनदाट जंगलात आहे. ड्रोनच्या सहाय्याने आणि विविध पद्धतीने त्याचा एक दोन नाहीतर तब्बल आठ दिवस शोध घेतला मात्र सिद्धांतचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे आता त्याचे पुण्यात राहणारे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या एकुलत्या एक लेकराचा असा शेवट होऊ शकत नाही, असं म्हणत पाटील कुटुंबात जप आणि पुजा केली जात आहे.
सिद्धांत नक्की सापडेल?, मामाला विश्वास
"सिद्धांतला शोधा, तो जिवंत आहे. कदाचित कुठेतरी रस्ता चुकला असेल किंवा कुठेतरी थांबला असेल. त्याचा असा शेवट होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांच्या आईनं हंबरडा फोडला आहे. ज्या दिवशी ही सिद्धांत बेपत्ता झाल्याची बातमी त्याच्या अमेरिकेतील ऑफिसमधून समजली त्यादिवसापासून त्याचे आई-वडिलांनी जेवणंदेखील बंद केलं आहे आणि तो कधीतरी सापडेल, याकडे डोळे लावून बसले आहेत", असं सिद्धांतचे मामा प्रितेश यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
सिध्दांतसोबत नेमकं काय घडलं?
अमेरिकेत मित्रांसोबत फिरायला गेलेला असताना तो पाय घसरून दरीत पडला अशी माहिती सिद्धांत सोबतच्या मुलांनी पालकांना दिली होती. आपला मुलगा सापडणार की नाही, तो कोणत्या अवस्थेत असेल तसेच त्याची काही माहिती मिळावी यासाठी त्याचे आई-वडिल काळजीत आहेत.
भारतील दुतावासाकडून शुन्य मदत
सिद्धांतचा शोध घेण्यासाठी त्याचा मामा भारतातून जीतोड मेहनत घेताना दिसत आहे. सिद्धांतला शोधण्यासाठी त्यांनी शरद पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलं आहे. या सगळ्या नेत्यांकडून त्यांना फॉर्मल मेसेज आला आहे. मात्र कोणीही यासंदर्भात गंभीर दखल घेताना दिसत नसल्याचं प्रितेश चौधरी म्हणाले. चौधरी यांनी दुतावासाकडून मदत मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावं आणि अमेरिकेतील प्रशासनाशी बोलावं, अशी मागणी चौधरींनी केली आहे.