Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Bopdev Ghat Incident: बलात्कारातील आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी 20 किलोमीटरच्या अंतरासाठी चक्क 81 किलोमीटरचा प्रवास केला.
पुणे: पुण्यात बोपदेव घाटात घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात अखेर नऊ दिवसांनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. मात्र, या घटनेनंतर या तिन्ही आरोपींनी मोठ्या शिताफीने आपला गुन्हा लपवण्याचा यावेळी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या तिन्ही नराधमांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीला आपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा लपवण्यासाठी काय केलं आणि सीसीटिव्हीतून वाचण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर केला ते सांगितले.(Bopdev Ghat Incident)
बलात्कारातील आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी 20 किलोमीटरच्या अंतरासाठी चक्क 81 किलोमीटरचा प्रवास केला. तिन्ही आरोपी मध्य प्रदेशातील असून गेली काही वर्षं पुणे आणि परिसरात कचरा वेचणे आणि इतर लहान सहान कामे करतात. पण त्यांचा मुख्य कल हा चोरी करण्याकडे राहिला असल्याची माहिती आहे.
अत्याचाराची घटना घडली त्या दिवशी नेमकं काय घडलं?
रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या आरोपींनी बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या येवलेवाडीतील बिअर शॉपीमधून बिअर विकत घेतली. ती बिअर ते प्यायले. त्यानंतर तिघे साडेदहाच्या दरम्यान घाटातूनवरती सपाटीचा भाग असलेल्या ठिकाणी गेले. तिथे त्यांना पिडित तरूणी आणि तिचा मित्र दिसले. त्यांनी त्या दोघांना धमकावलं, त्यांच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तु घेतल्या, मुलीवर त्यांनी अत्याचार केला. (Bopdev Ghat Incident)
बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी घाटाच्या वरच्या बाजुला गेले, त्यानंतर दुसऱ्या मार्गाने घाट उतरुन खाली आले आणि वेगवेगळ्या रस्त्यांनी खेड शिवापुरला गेले. टोलनाक्यावरुन त्यांनी आणखी वेगळा मार्ग निवडला. सकाळपर्यंत ते फिरत राहिले. या काळात त्यांनी कुठेही मोबाईलचा वापर केला नाही. त्यानंतर ते तिघे वेगळे झाले. पोलीसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर केला . या आरोपींना पकडण्यासाठी पोलीसांनी जवळपास 700 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
एका व्यक्तीने एका दुचाकीवरुन फिरणाऱ्या तिघांचे वर्णन पोलीसांना सांगितले. त्यावरुन आरोपींचे स्केच आणि सीसीटीव्ही आर्टिफिशीअल इंटेलीजन्सच्या सहाय्याने पडताळून पाहिले असता ते जुळून आले आणि पोलीसांच्या तपासाला गती मिळाली. पोलीसांनी त्या दिशेने तपास केला आणि पुण्याजवळील ग्रामीण भागातून काल एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्याच्या दोन साथिदारांकडे देखील चौकशी सुरु आहे. या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल दहा लाख रुपयांचे इनाम पुणे गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलीस यांना विभागून देण्यात येणार आहे.