रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत मुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार
शिवनेरीच्या दररोज नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त 32 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.याशिवाय मागणीनुसार साध्या बसेस सुद्धा या मार्गावर धावणार आहेत.

मुंबई : कर्जत-लोणावळा दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने पुढील काही दिवसांसाठी बंद केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात घेत एसटी महामंडळाने या मार्गावर दोन्ही बाजूने (मुंबई-पुणे) दररोज शिवनेरीच्या जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
मुंबई-पुणे मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत नसल्याने परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने या मार्गावर जादा बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे शिवनेरीच्या दररोज नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त 32 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
याशिवाय मागणीनुसार साध्या बसेस सुद्धा या मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी 15 ऑगस्ट उजाडणार आहे. पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. तसेच पाणी साचल्यामुळेही रेल्वे मार्गाचं मोठं नुकसान झालं आहे. याठिकाणी दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे, मात्र वाहतूक सुरु व्हायला 15 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?





















