(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP MLA Dilip Mohite Patil: मोदींच्या राज्यात हिंमत दाखवणं आम्हाला जड जात आहे; राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात हिंमत दाखवणं आम्हाला जड जात आहे, असं जाहीरपणे कबुली देत ब्रिटिशांच्या राजवटीची पुनरावृत्ती होते की काय? अशी भीती दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केली आहे.
NCP MLA Dilip Mohite Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. पुण्याच्या आळंदीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या जयंती उत्सवात मोहिते उपस्थित होते. त्याच कार्यक्रमातील मनोगतातील एक मिनिटं दहा सेकंदाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात हिंमत दाखवणं आम्हाला जड जात आहे, असं जाहीरपणे कबुली देत ब्रिटिशांच्या राजवटीची पुनरावृत्ती होते की काय? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आमच्यासारख्यांना आता ईडीची भीतीदेखील वाटत आहे. कारण कोण कशा पद्धतीने कशात अडकवतील याचा काही नेम नाही. असंही ते म्हणाले.
या व्हिडीओत काय आहे?
दिलीप मोहितेंनी ब्रिटिशांचा कठीण काळ बोलून दाखवला. तेंव्हा कोणती दाद अन फिर्याद ही नव्हती. कोणी काही करायला गेलं की लगेच शिक्षा व्हायची. याच इतिहासाची आता पुनरावृत्ती होते का? अशी भीती मोहितेंनी व्यक्त केली. भाजपमध्ये गेल्यावर काहीही बोललं तरी ईडी-सीडी अशी कोणतीच भानगड मागे लागत नाही. पण मोदींच्या राज्यात आम्ही काही बोलायचं म्हटलं की लगेच फोन येतो, तुमच्या दोन फाईल पाठविल्या आहेत. त्यामुळे आत्ताचा कार्यकर्ता भीतीच्या सावटाखाली जगतोय. लोकशाही कोणी वाचवायची असा प्रश्न मला पडलाय आणि आता परत लोकशाहीर अण्णा भाऊ जन्माला येतील याबाबत ही मला शंका आहे. असं मत मोहितेंनी व्यक्त केलं.
यापुर्वी सुद्धा त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. राम मंदिराच्या विषयावरुन त्यांनी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली होती. भाजपं हिन्दूत्वाच्या नावाने भांडणे लावत आहे. राम मंदिराशी हिन्दू बांंधवांची नाळ जोडली आहे. भावना जोडली आहे. जिथे भावना असते तिथे देव असतो. एखद्याला टार्गेट करुन समाजात वाद निर्माण करायचा. त्यांच्यात तेढ निर्माण करत राजकारण करण्याता खटाटोप करत आहेत. यांच्यासारख्यांमुळेच विकासाला खिळ बसली आहे, असं देखील ते म्हणाले होते.