Walmik Karad Surrender: धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का?, कराडच्या आत्मसमर्पणावर संभाजीराजेंनी ठेवलं बोट
Chhatrapati Sambhajiraje on Walmik Karad Surrender: या प्रकरणावरती छत्रपती संभाजीराजे यांनी बोट ठेवत धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का? असा सवाल उपस्थित केला आहे.
Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या होऊन जवळपास 22 ते 23 दिवस उलटले आहेत. संतोष देशमुख प्रकरणावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं. त्यानंतर या प्रकरणामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराडचं नाव आलं आणि राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप व्हायला सुरूवात झाली. बीडच्या खंडणी प्रकरणासह संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असल्याचा दावा केला जाणारा वाल्मिक कराड आज अखेर पुण्यात सीआयडीला शरण आला. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली. सीआयडीकडून त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरती छत्रपती संभाजीराजे यांनी बोट ठेवत धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का? असा सवाल उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणालेत संभाजीराजे?
छत्रपती संभाजीराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, 22 दिवस हा वाल्मिक कराड सापडत नाही. 22 दिवसातले काही शेवटचे दिवस तो पुण्यात आहे, सीआयडीला देखील हे कळत नाही तो पुण्यात आहे, तो पुण्यातून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊन येतो. तिथल्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे, हॉस्पिटल मधील लोकांनी देखील याच्याबद्दल माहिती का दिली नाही, त्याच्यासोबत जे दोन नगरसेवक आहेत. त्यांनी देखील काही माहिती सांगितली नाही, त्याला आत्मसमर्पण करायला 22 दिवस का लागले असे अनेक सवाल देखील त्यांनी उपस्थित केले आहेत.
तर काल धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत काय झालं, ते आम्हाला सामान्य जनतेला माहिती हवं. अजित पवारांना देखील मला विचारायचा आहे. इतर गोष्टींमध्ये परखडपणे मत मांडणार अजित पवार आज शांत का आहेत, तुम्ही शांत बसून चालणार नाही, हे असं चालणार नाही या प्रकरणातील जे सात जण आरोपी आहेत त्या यांचा म्होरक्या हा वाल्मिक कराड आहे. त्या वाल्मिक कराडचा जिवलग मित्र हा धनंजय मुंडे आहे. नेहमी परखडपणे बोलणारे अजित पवार आजही मुद्द्यावर का बोलत नाहीत त्यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण द्यावं, धनंजय मुंडे तुमच्या पक्षाचे नेते आहेत, असं म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी अजित पवारांना देखील सवाल उपस्थित केले आहेत.22 दिवसांनंतर वाल्मिक कराड कसा सरेंडर झाला. वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही. काल चर्चा आणि आज सरेंडर झालं आहे का? धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
तर मी शिक्षा भोगायला तयार - वाल्मिक कराड
मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.