Devendra Fadanvis In Pune : ...तेव्हा इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता त्यामुळे गैरसमजात राहू नका; देवेंद्र फडणवीसांचं पुरंदरमध्ये मोठं विधान
इंदिरा गांधी त्या काळातल्या पॉवरफुल्ल नेत्या होत्या त्यांचाही एकेकाळी पराभव झाला होता. त्यामुळे कुणीही गैरसमजात राहू नये, असा खोचक सल्ला देखील फडणवीसांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.
Devendra Fadanvis In Pune : बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती आहे, त्यामुळे कोणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे , असं विधान राष्ट्र्वादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. इतिहासाची पार्श्वभूमी सांगत त्यांनी इंदिरा गांधींच्या कारकिर्दीचा उल्लेख केला. इंदिरा गांधी त्या काळातल्या पॉवरफुल्ल नेत्या होत्या त्यांचाही एकेकाळी पराभव झाला होता. त्यामुळे कुणीही गैरसमजात राहू नये, असा खोचक सल्ला देखील फडणवीसांनी यावेळी विरोधकांना दिला आहे. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईकांची शासकीय 231 व्या जयंतीनिमित्त त्यांनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते.
स्थानिकांशी चर्चा करुन निर्णय
पुरंदरच्या विमानतळाच्या जागेला गावकऱ्यांचा विरोध होणार ही कल्पना होती आणि गावकऱ्यांची भूमिका स्वाभाविक आहे. यापुर्वी देखील असे अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. अनेकांचा विरोध पत्करला आहे. यावेळी देखील नागरिकांशी चर्चा करुन पुरंदर विमानतळाचा प्रश्नदेखील मार्गी लावणार आहोत. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असं मत उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
विमानतळासाठी जागा देण्यास गावकऱ्यांचा विरोध
पुरंदर विमानतळाला जागा देण्यास गावकऱ्यांचा नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गावकरी या संदर्भात निवेदन देणार आहे. पारगाव, खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी आणि वनपुरी गावच्या 7 जणांचे शिष्टमंडळ निवेदन देणार असल्याची माहिती आहे. नव्या जागेला संरक्षण विभागाने परवानगी नाकारल्यामुळे पहिल्याच जागेवर विमानतळ होणार अशी चर्चा होती. मात्र त्या जागेवरील गावकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिला आहे. मात्र या संदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करुन योग्य मार्ग काढला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
भाजपचं मिशन बारामती
आगामी निवडणुकांसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांंच्या बारामतीकडे भाजपचं विशेष लक्ष आहे. यासाठी भाजपचे विविध नेते बारामतीचा दौरा करत आहेत. भाजप अध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीचे दौरे करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारमणदेखील बारामतीचा दौरा करणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी बारामतीवर भाजपचं विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे.