इंदापूरमधील निमगावमध्ये पूरस्थितीस कारण ठरलेले अतिक्रमण काढण्याचे अजित पवारांचे आदेश
अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले की निमगाव केतकी येथील ओढ्याची हद्द निश्चित करून त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढणार आहे.
इंदापूर : पुण्यात 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापूर सदृश्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतीसह राहत्या घरांचे व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी घुसल्याने सर्वसामान्यांची मोठी तारांबळ झाली. वैतागलेल्या या लोकांद्वारे ओढ्याने जाणारे पाणी हे गावात का शिरले? याविषयी विचारमंथन सुरू झाले. गावात ओढ्या नाल्यात झालेले अतिक्रमण हे त्याचे मुख्य कारण लक्षात येतात अनेकांनी या अतिक्रमणावर रोष व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. स्थानिकांशी संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
अजित पवार सोलापूर दौर्यावर जात असताना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीतील याच अतिक्रमणाने पीडित असलेल्या ओढ्यावर थांबले. यावेळी गावकऱ्यांनी आपली व्यथा अजित पवार यांच्यासमोर मांडली. हे अतिक्रमण पाहताच दादा संतापले दादांनी थेट तिथे उपस्थित असणाऱ्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तसेच तहसीलदार यांना या ओढ्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्याचे आदेश दिले. कागदी घोडे नाचवत, पाहू, मी सांगतो, अशी समाधानासाठी मोगम उत्तरे न देता दादांनी ते अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्याने निमगावकरांनी रोखठोक व प्रशासनावर वचक असणारे दादा अनुभवले. या पूर परिस्थितीमुळे गांगरलेल्या निमगावकरांना एक सुखद धक्का बसला.
ओढ्याची हद्द ठरवून अतिक्रमण काढून टाकणार
अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले की निमगाव केतकी येथील ओढ्याची हद्द निश्चित करून त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढणार आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हे मोठी लोकसंख्या असणाऱ्या गावात ओढ्याचे पाणी थेट बाजारपेठेत शिरल्याने अनेक दुकानांमध्ये, राहत्या घरांमध्येही पाणी शिरले. याविषयी आक्रोश व्यक्त करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये वाहून जाणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी यांच्यासह व्यवसायिकांच्या मालांचे झालेले नुकसान, उघड्यावर पडलेले संसार व्यथा या व्हिडीओमधून मांडल्या गेल्या. त्याला कारण अतिक्रमण असल्याचा जोर या व्हिडीओतून समोर येत होता.
दोन दिवसापूर्वी अनेक सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर ती एक चारचाकी पावसाच्या पाण्यात वाहत जात असतानाचा व्हिडिओ दाखवला जात होता. तो व्हिडिओ याच निमगाव केतकी गावातील होता. खाण्याच्या पानांचे निमगाव केतकी अशी महाराष्ट्रात ओळख असलेले इंदापूर तालुक्यातील हे निमगाव केतकी अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहे. या गावालगत असणाऱ्या मुख्य ओढ्यावर गावातील धनदांडग्या पुढाऱ्यांनी अतिक्रमण करत त्याची रुंदी कमी करत ओढ्याचे पात्र कमी केले असल्याच्या आरोपा होऊ लागला. गावकऱ्यांचा आवाज या अतिक्रमणाविरुद्ध कधी निघाला नाही. अतिवृष्टीच्या या पाण्याने मात्र या गावकऱ्यांच्या कंठातून या अतिक्रमणाच्या विरोधात आक्रोश निघाला.