Deenanath Mangeshkar hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोफत उपचार करतो सांगून प्रकाश आमटेंकडून औषधांसाठी पाच लाख मागितले; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Deenanath Mangeshkar hospital: एका खासदाराने साहित्य संमेलनात येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिल्यानंतर संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले होते, असे वडेट्टीवारांनी सांगितले.

नागपूर: प्रकाश आमटे हे थोर समाजसेवक होते. त्यांना कर्करोग झाल्यावर दीनानाथ रुग्णालयात दाखल केले. दीनानाथ रुग्णालयाकडून प्रकाश आमटे (Prakash Amte) यांच्याकडून आम्ही एकही रुपया आम्ही घेणार नाही, असे सांगितले होते. नंतर उपचार सुरू झाले तेव्हा बाहेरुन औषधे मागवण्याच्या नावाखाली दीनानाथ रुग्णालयाने (Dinanath Mangeshkar Hospital) आमटे यांच्याकडे पाच लाख रुपये मागितले. महाराष्ट्रभूषण थोर समाजसेवकालाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सोडले नाही, असे वक्तव्य दीनानाथ काँग्रसेचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadditwar) यांनी केले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. तनिषा भिसे यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. मी मंगेशकर रुग्णालय आणि मंगेशकर कुटुंबीयांबद्दल वक्तव्य केलं, तर माझ्यावर टीका झाली, असे त्यांनी म्हटले. ते शनिवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विदर्भ साहित्य संघाच्या उत्सवात लता मंगेशकर यांनी मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. साहित्य संघाने तयारी करून संपर्क साधले, तेव्हा तिथून निरोप आला की, पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, स्पेशल फ्लाईट करून द्या. त्यासाठी 22 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. हे पैसे चेकने देण्याची तयारी दर्शवल्यानंतर दीनानाथ मंगेशकर यांनी पैसे चेकने नाही, तर कॅशने द्या, असे म्हटले. विदर्भ साहित्य संघाने आम्ही संस्था असल्याने कॅशने पैसे देणे शक्य नाही, असे सांगितले व लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी हृदयनाथ मंगेशकर जे सांगत आहेत तसेच करा, असे सांगितले गेले. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
एका खासदाराने साहित्य संमेलनात येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिल्यानंतर संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले होते. त्या खासदाराने ते पैसे दिले. परंतु, कार्यक्रम जवळ आल्यावर आणखी तीन लाख रुपये मागितले गेले. कार्यक्रमात येण्यासाठी लता मंगेशकर पैशांच्या मागणीवर अडून राहिल्या, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.
लता मंगेशकरांनी 'त्या' खासदाराची पैशांसाठी अडवणूक केली: वडेट्टीवार
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सातवा फ्लोर मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव आहे. हे धर्मादाय रुग्णालय असूनसुद्धा तपासणीसाठी 20 रुपये ऐवजी 600 रुपये घेतात. ही लूट नाही का? सातवा माळा मंगेशकर कुटुंबीय आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी राखीव का?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणात काल आलेला तिसरा अहवाल मन हेलावून टाकणार आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. उपचार न देऊन तिचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये, मग तो कितीही मोठा माणूस असू दे. कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. माझ्यावर टीका केली जात असली तरी मला त्याची चिंता नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
याशिवाय, जेव्हा जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायनाचा कार्यक्रम ठरला होता, तेव्हा निमंत्रण आशा भोसले यांच्यासाठी होते. लता मंगेशकर यांना निमंत्रण नव्हते. मात्र, लता मंगेशकर यांनी तिथे गायन केलं.. तिथे ही मानधन घेऊन गायन केलं. नेहरूसमोरचे त्यांचे गायन मोफत नव्हते. हे रुग्णालय आमदाराच्या पीएकडून दहा लाख रुपये मागत असतील. तर हे धर्मादाय रुग्णालय कसे? गरिबांसाठीचे हॉस्पिटल कसे?, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा























