(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule : गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची 10 कोटी रोकड आली कुठून?; दसरा मेळाव्याच्या खर्चावरुन सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
Supriya Sule : मला तर वाटते आपण लाटणे घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढायला हवा, पण मंत्रालयात मंत्री जागेवर नसतात, असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
Supriya Sule : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून राज्यभरातून बस भरुन कार्यकर्ते येणार आहेत, त्यासाठी येणाऱ्या खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. सगळे व्यवहार ऑनलाईन सुरु असताना ही एवढी मोठी रक्कम रोकड बघायला मिळते तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्याची तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. भरतगाव येथे एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विश्वास महत्त्वाचा असतो, त्याला तडा जाता कामा नये. मला तर चिंता वाटत असून दौंड मधूनच मोदी साहेबांना फोन लावावा आणि ही 10 कोटीची रोकड कुठून आली अशी विचारणा करावी असं वाटतंय. याची चौकशी लावा असं सांगावं तर ते म्हणतील, आम्ही हे दहा कोटी रोकड राज्यातून जमा केली."
'लाटणे घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढायला हवा'
सुप्रिया सुळे राज्य सरकारवर टीका करताना म्हणाल्या, "संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेत मिळत नाहीत. लहान मुलांच्या दुपारच्या जेवणाचे पैशाला कट मारला आहे. त्यांच्या जेवणातील भात, भाज्या राज्य सरकारने कमी केले आहे. एकीकडे आपल्या काही योजना कमी करत आहेत आणि इकडे दहा कोटी रुपये रोकड भरत आहेत. मला तर वाटते आपण लाटणे घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढायला हवा पण मंत्रालयात मंत्री जागेवर नसतात."
'ये तो चुनावी जुमला है'
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील निवडणुकीच्या काळात 'ये तो चुनावी जुमला है' असे म्हणाले होते. म्हणजेच आपल्या भाषेतील थाप मारली होती. पंधरा लाख रुपये आपल्या खात्यावर जमा होणार अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यावर तर मी बोलणारच नाही. आपल्याला दोन मते कमी मिळाले तरी चालतील पण लोकांना फसवून मते घ्यायचे नाहीत, असा टोला त्यांनी अमित शहांना लगावला आहे.
'दादांनी निर्णय घेतले म्हणून ते बदलले'
राज्यात आलेल्या नवीन सरकारने निधी थांबवला आहे. ते पैसे तुमचे आहेत. तुम्ही टॅक्स भरता म्हणून सरकार चालते. मात्र होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. आपल्या लेकरांसाठी असणारा पाणी, शाळा, अंगणवाडी अस्मिता भवन हा गोरगरिबांचा निधी त्यांनी थांबवला आहे आणि केवळ ते अजित दादांनी निर्णय घेतले म्हणून ते बदलले आहे, असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केला.