(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News: ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ
Pune Crime News: गणपती विसर्जनादिवशी तर एकाने थेट फिनिक्स मॉलच्या दिशेने गोळीबार केला तर दोघांनी एकाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात कायदा अन सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणपती विसर्जनादिवशी तर एकाने थेट फिनिक्स मॉलच्या दिशेने गोळीबार केला तर दोघांनी एकाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रियकराचा खून करण्यासाठी पती थेट बिहारहून पुण्यात आल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं आहे. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून आणि दोन ठिकाणी गोळीबारासह चोऱ्या-माऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. वाकडचे पोलीस निरीक्षक एस बी कोल्हटकर यांचे तर गुन्हेगारांवर कोणतीच पकड राहिली नसल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न व्हर्च्युअली सोडविण्याचा विडा हाती घेतलेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वाकडमध्ये काय सुरुये याची कल्पना आहे की नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. (Crime News Pune)
अशातच हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत बावधनमध्ये आणखी एक खुनाची घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांवर अनेकदा खरडपट्टी केलेली आहे. पण याचं पिंपरी चिंचवड पोलिसांना काही सोयरसुतक नसल्याचं दिसून येतं आहे. ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये घटनांनी हे अधोरेखित केलं आहे.
फिनिक्स मॉलवर एकाचा गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद
पिंपरी चिंचवडमध्ये फिनिक्स मॉलजवळ एक व्यक्ती चारचाकी वाहनातून खाली उतरला. त्यानंतर फिनिक्स मॉलच्या गेट नंबर सातच्या दिशेने त्याने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मॉलच्या गेट समोर उभं राहून अज्ञात व्यक्ती गोळीबार करताना सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. तरी गणपती विसर्जनाच्या दिवशी मॉलच्या गेटवर गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे. त्या व्यक्तीने गोळीबार का केला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस घटनेचा तपसा करत आहेत, तर नागरिकांनी सुरक्षेच्या प्रश्वावरती संताप व्यक्त करत पोलिसांबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.