तुरुंगात 21 वर्षे शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्याला उदरनिर्वाहासाठी गाय भेट
पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही जर्सी गाय आणि कालवड संबंधित बंदिवान नंदू पवारला देण्यात आले.
पुणे : कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या कैद्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, समाजानेही त्यांना सन्मानाने वागवावे यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्यावतीने एक चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे. तब्बल 21 वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या एका कैद्याला एक जर्सी गाय आणि कालवड प्रदान करण्यात आली आहे.
पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही जर्सी गाय आणि कालवड संबंधित बंदिवानाला देण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक कारागृहचे सुनील रामानंद, कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
या जर्सी गायीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील नंदू पवार या कैद्याने नवीन आयुष्य सुरू केले आहे. त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. नंदू पवार आणि आणि त्यांचा मुलगा श्याम पवार यांना गाय आणि कालवड देण्यात आले. या उपक्रमांतर्गत यापूर्वी एका बंदिवानास चप्पल दुकान तर एकाला ऑर्केस्ट्रा सुरू करून दिला असून त्यांनी याद्वारे नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
सुनील रामानंद यावेळी बोलताना म्हणाले, यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून बंदी आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरु करू शकतात. त्यांच्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळू शकते. हा उपक्रम केवळ पुण्यातील कारागृहापुरता मर्यादित न राहता राज्यभर राबविण्यात यावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व मदत करण्यात येईल.