Lockdown Effect | सांगा घरभाडं कसं भरायचं? भाडेकरुंचा अगतिक सवाल
लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर सेल्स, मार्केटिंगमध्ये असलेल्या नोकरदारांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुसमोर घरभाडं कसं भरायचा असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
पुणे : 24 मार्चपासून सुरु झालेल्या देशव्यापी लॉकडाऊननंतर मात्र आता शहरांमध्ये भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुंसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर सेल्स, मार्केटिंगमध्ये असलेल्या नोकरदारांच्या मासिक उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. असे सगळे भाड्याने राहणारे नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्यासमोर एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे, तो म्हणजे आता घरभाडं द्यायचं कसं?
सगळं ठप्प असताना घर चालवण्यासाठी पैसे पुरवताना ओढाताण होत असताना घरभड्याची एक मोठी रक्कम पूर्णपणे भरणं अशक्य असल्याची भावना भाडेकरुंनी एबीपी माझाकडे व्यक्त केली.
पुण्यातील एका भाडेकरुने हीच समस्या मांडली. ते म्हणाले, "मी पुण्यातील बिबवेवाडी भागात भाड्याने राहतो. मी खाजगी कंपनीमध्ये सेल्स विभागात नोकरीला आहे. माझा पगार नऊ हजार आहे. सेल्समध्ये असल्याने वेगवेगळे भत्ते आणि काम असं मिळून 30 हजार रुपये पडतात. पण आता सगळेच व्यवहार बंद असल्याने या फक्त 9 हजार एवढी बेसिक सॅलरी मिळाली. पण माझं घरभाडंच 10 हजार रुपये आहे. मी आता इतकी मोठी रक्कम भाडं म्हणून कसं भरु?" पुढे बोलताना ते म्हणाले की, "घरभाडं न भरल्यास डिपॉझिटमधून कापून घेण्याची भूमिका घरमालकांनी घेतली आहे. आम्ही काय करावं?"
भाड्याने राहणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचीसुद्धा हीच पंचाईत झाली आहे. लॉकडाऊननंतर व्यवसाय बंद आहे. पण जगण्याच्या गरजा बंद नाहीत. त्यामुळे आता दैनंदिन खर्च, घरभाडं यांचा मेळ कसा घालायचा हा प्रश्न त्यांनाही सतावत आहे.
घर किंवा खोल्या भाड्याने घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांचीही काही वेगळी परिस्थिती नाही. कॉलेज, क्लासेस बंद असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. पण तरीही महिन्याचं भाडं द्यावंच लागणार आहे.
याचा विचार करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या समन्वय समितीतर्फे सरकारला विद्यार्थांचं घरभाडं माफ करण्यात यावं अशी मागणी पत्राद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे. "शेतकरी, कष्टकरी यांची मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला पुण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या घरी पेचप्रसंग असल्यामुळे त्यांना घरभाडे देणे शक्य होत नाहीये. त्यामुळे सरकारने याचा विचार करुन मासिक भाडं माफ करावं," अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
सरकारने मासिक घरभाडं या प्रश्नाचा विचार करुन काहीतरी निर्णय द्यावा अशी मागणी इतर भाडेकरुंनीही केलेली आहे.