पुण्यात लग्नाचा जल्लोष महागात; नवदाम्पत्यासह 35 वऱ्हाडी कोरोना पॉझिटिव्ह, सात गावं सील
नववधू-वर, आई-वडील, पै-पाहुणे, मित्र-मंडळी असे उपस्थित 35 पेक्षा जास्त वऱ्हाडी आजवर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संपर्कात आलेल्या इतरांची ही तपासणी अद्याप होणं बाकी आहे. परिणामी हिवरे बुद्रुक, धालेवाडी, धनगरवाडी, वडगाव सहाणे, शिरवली, तेझेवाडी, किकेकरवाडी ही गावं कंटेन्मेंट म्हणून सील करण्यात आलीत.
पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने 50 वऱ्हाड्यांमध्ये लग्न लावण्याची मुभा दिली. पण पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हा नियम बदलण्यात आलाय. इथं केवळ 20 वऱ्हाड्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारण इथं पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यासह 35 हून अधिक वऱ्हाड्यांना कोरोनाची लागण झालीये. त्यामुळे वर-वधूच्या गावांसह सात गावं सील करण्यात आलीत. परिणामी हजारो ग्रामस्थ कोरोनाच्या धास्तीत आहेत.
जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुकमधील मुलाचे धालेवाडीतील मुलीशी नुकताच विवाह झालाय. वर-वधू एकाच तालुक्यातील असल्याने या विवाहात 50 वऱ्हाड्यांची परवानगी धुडकवली गेली. आसपासच्या गावातील पै-पाहुणे आणि मित्र मंडळीच्या मोठ्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. नियमांचा भंग इथंच थांबला नाही तर हिवरे बुद्रुकमध्ये रात्री डीजेच्या तालावर वरातही निघाली. हिवरे बुद्रुक हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांचे, पण बेनकेंच्या कानापर्यंत डीजेचा दणदणाट पोहचलाच नाही. माझं गाव असलं तरी सध्या मी नारायणगावमध्ये वास्तव्यास असल्यानं गावात नेमकं काय घडलं हे मला माहित नव्हतं, असं आमदार बेनकेंचं यावर म्हणणं आहे. तोपर्यंत दणक्यात वरात पार ही पडली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे नियम डावलून विवाह सोहळा आणि वरात काढण्याचे परिणाम अखेर अनेकांना भोगावेच लागले. विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. मग काय सर्वांचेच धाबे दणाणले. जे घडू नये अशी अपेक्षा होती ते घडत गेलं. तालुक्यातील रोजच्या अहवालात विवाह सोहळा आणि वरातीला उपस्थित असणाऱ्यांची संख्या वाढू लागली. नववधू-वर, आई-वडील, पै-पाहुणे, मित्र-मंडळी असे उपस्थित 35 पेक्षा जास्त वऱ्हाडी आजवर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संपर्कात आलेल्या इतरांची ही तपासणी अद्याप होणं बाकी आहे. परिणामी हिवरे बुद्रुक, धालेवाडी, धनगरवाडी, वडगाव सहाणे, शिरोली, तेझेवाडी, ठिकेकर ही गावं कंटेन्मेंट म्हणून सील करण्यात आलीत.
परभणीत मुलाचा लग्न स्वागत समारंभ महागात! दहाजण कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाच्या काळात थाटामाटात लग्न करण्याची हौस सात गावातील हजारो ग्रामस्थांना संकटात टाकणारी ठरलीये. तरी प्रशासनाने केवळ डीजे ताब्यात घेत डीजे चालकावर ओतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. विवाह सोहळा आयोजक आणि मंगल कार्यालय मालकावर गुन्हा का दाखल केलेला नाही? या प्रश्नावर प्रशासन अनुत्तरित आहे. कोरोनाच्या सावटाखाली लग्नसराई पार पडतीये. अशात वऱ्हाड्यांकडून उतावळेपणा झालेला दिसतोय.
- सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासणे - फोटो काढताना मास्क बाजूला करणं - फोटो काढताना नवदाम्पत्याला खेटून उभं राहणं - जेवणाच्या रांगेत विनामास्क झुंबड उडवणं - हात सॅनिटाईज न करता जेवायला बसणं
अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून वऱ्हाडी मंडळी कोरोनाच्या महाभयंकर संकटाला आमंत्रित करतायेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यात 50 ऐवजी केवळ 2 वऱ्हाड्यांनाच विवाह सोहळ्यांसाठी आता परवानगी दिली जातीये. एकतर कमी संख्येत अथवा कोरोनाच्या महामारीनंतर विवाह सोहळे घ्यावेत, असं आवाहन ही पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय.
Lockdown 6.0 | पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पुणेकरांची तुफान गर्दी; भाजीपाला खरेदीसाठी झुंबड