Pune News: कोंढव्यातील ड्रेनेज लाईन फुटल्याने नागरिक त्रस्त; तोडगा न काढल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा
पुण्यातील कोंढवा परिसरात ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे सगळ्या परिसरात दुर्गंध पसरली आहे. कोंढवा खुर्द-मिठानगर हा दाट लोकवस्तीचा आणि अतिशय छोटे रस्ते असलेला परिसर आहे.
Pune News: पुण्यातील (pune) कोंढवा (Kondhwa) परिसरात ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे सगळ्या परिसरात दुर्गंध पसरली आहे. कोंढवा खुर्द-मिठानगर हा दाट लोकवस्तीचा आणि अतिशय छोटे रस्ते असलेला परिसर आहे. त्यात पावसामुळे मागील आठ दिवसापासून मिठानगर मुख्य रस्त्यावरील चेतना गार्डन सोसायटीसमोरील ड्रेनेजचे झाकण तुटुन संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर आले आहे. रस्त्याला नदीचं रुप प्राप्त झालं आहे.यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कुठलीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर लवकरात लवकर तोडगा काढा नाहीतर पुणे महापालिकेवर मोर्चा काढू, असा इशारा माजी नगरसेवक गफुर भाई पठाण यांनी दिला आहे .ड्रेनेज लाईन फुटल्याने घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी संपुर्ण रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच गेले काही दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या बाबत आक्रोश वाढत आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या पालिका प्रशासन आहे. त्यामुळे पालिका प्रशासन,वार्ड ऑफिसर यांना वारंवार तक्रार करुन, पाठपुरावा करुन देखील निधी उपलब्ध नसल्याचं कारण देत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात या समस्येवर कुठलीही ठोस उपाययोजना झाली नाही तर नागरिकांसमवेत पालिकेवर मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक माजी नगरसेवक गफुर पठाण यांनी दिला आहे.
गेले काही दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस पडला. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. अनेक ठिकाणी रस्ते तुंबले होते. या सगळ्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. याआधी पुण्यातील एरंडवणे परिसरातील राजपूत वीट भट्टी येथील परिसरात मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं. महापालिकेने ड्रेनेजची कामे वेळेवर केली असती तर आमचं नुकसान झालं नसतं, असं नागरिकांचं मत आहे.