Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे आज शब्द सत्यात उतरवणार, बैलगाड्या समोर घोडीवर बसणार
खासदार अमोल कोल्हे हे आज दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. कोल्हे आज पुण्याच्या निमगाव दावडी येथील घाटातील बारीत घोडीवर बसणार आहेत.
Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आज सत्यात उतरवणार आहेत. यासाठी ते पुण्याच्या निमगाव दावडी येथील घाटातील बारीत घोडीवर बसणार आहेत. खंडोबाच्या मानाचा हा घाट आहे. आज बैलगाडा मालक या मानाच्या घाटात स्वखुशीने त्यांच्या सर्जा-राजाची जोडी उतरवतात. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे त्यांचा शब्द पूर्ण करणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास कोल्हे घोडीवर बसून, बैलजोडी समोर बारी मारणार आहेत.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao Patil) यांनी याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांना 11 फेब्रुवारीला छेडलं होतं. प्रचारात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आढळरावांनी त्यांच्या गावातील घाटात येण्याचं आमंत्रण कोल्हे यांना दिले होते. आढळराव पाटील यांनी कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं. बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. या कोल्हेंच्या आश्वासनावरून आढळराव पाटलांनी त्यांना अनेकदा घाट दाखवला. पुढे देखील ते अनेकदा कोल्हेंना या मुद्यावरुन कोंडीत पकडू शकतात, हे लक्षात आल्यानं पहिल्या बारीत नाही तर नाही निदान मानाच्या घाटात तरी घोडीवर बसण्यासाठी कोल्हे आज तयार झालेत. खेड तालुक्यात कोल्हेंची बारी पाहायला बैलगाडा शौकिनांना देखील उत्सुकता लागलेली आहे.
अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती सुरू झाल्यावर पहिल्या बारीत घोडीवर बसेन असे जनतेला आश्वासन दिले होते. यावरुनच आढळराव पाटील यांनी त्यांना छेडले होते. खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला तो शब्द सत्यात उतरवावा, असं खुलं आव्हान आढळराव पाटलांनी खासदार कोल्हेंना दिलं होतं. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी कोल्हेंना निमंत्रण धाडलं अखेर आढळराव पाटलांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: