एक्स्प्लोर
पुण्यातील गहुंजे बीपीओ बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण, हायकोर्टाने निकाल राखून ठेवला
हायकोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत दोन्ही आरोपींच्या फाशीला दिलेली स्थगिती कायम राहील.

मुंबई : पुण्यातील गहुंजे येथील बीपीओ कंपनीतील महिला कर्मचारी बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुनावलेल्या फाशीला विरोध करणाऱ्या अपीलावरील सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. हायकोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत दोघांच्या फाशीला दिलेली स्थगिती कायम राहील. या प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम बोराडे आणि प्रदीप कोकडे यांना 24 जूनला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी होणार होती. पुण्यातील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन तिची भीषण हत्या केल्याबद्दल पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे यांना फाशी सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं साल 2015 तर राष्ट्रपतींनी 2017 साली ही फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र दया याचिका फेटाळल्यानंतर तब्बल दोन वर्ष राज्य सरकारने तिची अंमलबजावणी करण्यात अकारण विलंब केला, यामुळे आमच्या जगण्याचा अधिकाराला बाधा आली आहे, असा आरोप करत फाशी रद्द करून जन्मठेप देण्याससाठी या दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या आरोपांचं खंडन केंद्र सरकार, गृह विभाग आणि येरवडा कारागृह अधिक्षकांच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करून करण्यात आलं आहे. या प्रतिज्ञापत्रात संपूर्ण कालावधी तपशीलवार मांडण्यात आला आहे. दया याचिका सन 2017 मध्ये नामंजूर झाल्यानंतर मागील दोन वर्षांपासून राज्य सरकार आणि कारागृहामार्फत पुणे सत्र न्यायालयाला आरोपींना फाशी देण्याबाबत अनेकदा अर्ज केला होता, मात्र न्यायालयाकडून विलंब झाला असा दावा करण्यात आला आहे. केन्द्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सांगण्यात आले आहे की, आरोपींची दया याचिका 18 मे 2016 रोजी दाखल झाली आणि त्यावर सविस्तर अभ्यास करुन 26 मे 2017 रोजी निर्णय दिला.
आणखी वाचा























