हे सरकार खुनशी, विरोधी पक्षातील नेत्यांच्या मतदारसंघातली विकास कामे होऊ देत नाहीत : चंद्रकांत पाटील
पुणे महापालिकेत आज त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन पुणे शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटल विषयी चर्चा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पुणे : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खुन्नस काढली जाते आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या मतदारसंघातील विकास कामेही ते होऊ देत नाहीत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुणे महापालिकेत आज त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन पुणे शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटल विषयी चर्चा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हे सरकार खुनशी, विरोधी पक्षातील नेत्यांच्या मतदारसंघातली विकास कामे होऊ देत नाहीत, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. भारतीय जनता पक्षाचे कोणतेही आमदार पवारांच्या संपर्कात नाहीत. जुने संबंध सर्वांचेच आहेत. काही काम असतात त्यामुळे भेटीगाठी होतच राहतात. परंतु या सरकारमध्ये खूप खुन्नस काढली जात आहे. मतदारसंघातली साधी विकासकामेही होत नाहीत. यासाठी लोकप्रतिनिधींना वरिष्ठ नेत्यांशी भेटणं आवश्यक असतं. त्याचा अर्थ ते त्या पक्षात चाललेत असा होत नाही. पवार आणि महाविकासआघाडी "आपले आमदार कुठे जात नाही त्यांचेच आणतो" असे सांगून आपल्या आमदारांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही तासापूर्वी ट्वीट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले आहे. उलट विधानसभा निवडणुकीआधी भाजपात गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर आहेत. परंतु यावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. यावर लवकरच निर्णय होऊन त्याची माहितीही दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते.