Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट, ससून रुग्णालयातील कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात
Lalit Patil Drug Case : ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असतांना त्याला अनेक गोष्टींची मदत करण्यामध्ये या कर्मचाऱ्याचा हात होता.
पुणे : ललित पाटील प्रकरणी (Lalit Patil Drug Case) रोज नवनवीन घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता याच प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक केले आहे. ललित पाटील हा रुग्णालयात उपचार घेत असतांना त्याला अनेक गोष्टींची मदत करण्यामध्ये या कर्मचाऱ्याचा हात होता. तसेच तो सतत ललित पाटीलच्या संपर्कात होता. महेंद्र शेवते असे या अटक करण्यात आलेल्या ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे नाव असून, तो शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता.
ससुन रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात शिपाई म्हणून काम करणारा महेंद्र शेवते हा ड्रग माफिया ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यावर शेवतेला अटक करण्यात आली आहे. शेवते हा जरी शिपाई म्हणून नियुक्त असला तरी, 16 नंबर वॉर्ड मधील कैदी आणि ससुनमधील वरिष्ठ अधिकारी यांच्यामधे तो दुवा म्हणून काम करत होता. 16 नंबर वॉर्डमधे तो सतत ये जा करत होता. 16 नंबर वॉर्डमधे काम करणाऱ्या 10 ते 12 नर्सेसकडे चौकशी केल्यानंतर महेंद्र शेवतेला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे शेवतेच्या चौकशीतून तो कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटील आणि इतर कैद्यांना मदत करत होता हे समोर येणार आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणातील ही महत्वाची घडामोड समजली जात आहे.
पुणे पोलिसांच्या विरोधात रविंद्र धंगेकर आक्रमक
ललित पाटील प्रकरणात आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पहिल्यापासून ससून रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची देखील त्यांनी सतत मागणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतेही कारवाई होत नसल्याने पुणे पोलिसांच्या विरोधात रविंद्र धंगेकर आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. यासाठी त्यांनी आता थेट पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. "डॉक्टर ठाकूर यांना पदमुकक्त केल्यानंतर नवीन डीन डॉक्टर विनायक काळे यांना अजुनही पदभार दिलेला नाही. ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. ससुन रुग्णालयातील कोणावरही पुणे पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाची नाचक्की होतेय. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने मी बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, " असे रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
राजकीय वातावरण तापले...
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यावर पहिल्या दिवसापासून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. ललित पाटील याला पळून जाण्यास काही सत्ताधारी राजकीय नेत्यांकडून मदत झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर, अजूनही या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या राजकारणात ललित पाटील प्रकरणाची चर्चा पाहायला मिळत असून, यावरून राजकीय वातावरण देखील तापतांना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: