Ajit Pawar: पुण्यात अजितदादांना मोठा धक्का! दिपक मानकरांना विधान परिषेदवर संधी न दिल्याने नाराजी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर 600 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Deepak Mankar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षांचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल झाली.
पुणे: गेल्या अनेक महिन्यापासून राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या प्रलंबित होत्या. त्या नियुक्त्यांकडे सर्वच राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल (मंगळवारी) विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी आणि आचारसंहिता कार्यक्रम जाहीर होण्याच्या काही तास अगोदर महायुतीतील पक्षांना राज्यपालांकडे सात नावे पाठवली. त्या सात सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी सहमती दर्शविल्यानंतर काल(मंगळवारी) उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व सात सदस्यांना आमदारकी पदाची शपथ दिली. यानंतर आता इच्छुक नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहेत.
सहाशे समर्थकांनी राजीनामे दिल्याचा दावा
राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नाराजी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षांचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल झाली. यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर यांची वर्णी लागली नसल्याने मानकरांच्या समर्थकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. सहाशे समर्थकांनी राजीनामे दिल्याचा दावा केला जातो आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये दिपक मानकर यांनी अनेक कार्यक्रम घेतले आहेत. पक्षासाठी त्यांनी काम केलं आहे. दिपक मानकर कुठे कमी पडले हे पक्ष नेतृत्वाने सांगावं. पक्षात असलेल्या एका वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबात किती पदं देणार, असं म्हणत नाव न घेता छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना देण्यात आलेल्या आमदारकीवर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच महिला प्रदेश अध्यक्षपद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद एकाच व्यक्तीला दिल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांना देखील लक्ष्य केलं आहे. त्या पक्षातील इतर नेत्यांना मोठे होऊ देत नाही असंही कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
यावेळी कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्याबाबत देखील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीवेळी 600 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमताने पदाचा राजीनामा देत यापुढील काळात केवळ कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचे जाहीर केलं आहे. तसेच येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आमची गार्हाणी मांडणार असल्याचे देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कोणत्या नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ?
हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे), मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे), पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), महंत बाबुसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा), विक्रांत पाटील (भाजपा), चित्रा वाघ (भाजपा) यांचा विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे. यांनी का आमदारकीची शपथ घेतली.