Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
लोकसभेला बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाल्यानंतर पुन्हा एकदा आता विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी टशन होणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.
Baramati Vidhan Sabha : बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद विरुद्द भावजय असा सामना रंगल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे अजित पवार गटाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला होता. लोकसभेला बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाल्यानंतर पुन्हा एकदा आता विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी टशन होणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.
पुढील सात दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल
बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढत होणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. दरम्यान युगेंद्र पवार यांच्याशी आज एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांना उमेदवारीबाबत विचारलं असता त्यांनी पुढील सात दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. दरम्यान, बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. बारामतीमध्ये आम्ही आभार दौरा आणि स्वाभिमान यात्रा काढली त्यावेळी लोकांचा विश्वास दिसून आला. महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय असेल तो मान्य केला जाईल. आमच्यापर्यंत काही निरोप आलेला नाही. मात्र, निर्णय आपल्या सर्वांनाच लवकरच कळेल. बारामतीचा निर्णय शरद पवार साहेब घेतील.
इंदापूरमधील अंतर्गत गटबाजी आम्ही बसून दूर करणार
इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना पक्षामध्ये घेण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवर कुरकुरी वाढल्या आहेत. या संदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, इंदापूरमधील अंतर्गत गटबाजी आम्ही बसून दूर करणार आहोत. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांना लोकांची साथ असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघांमध्ये दौरा करत असल्याने लोकांचा चांगला पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केलं.
बारामतीमधून अजित पवार हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार? अशी चर्चा रंगली होती. मात्र बारामतीमधून अजित पवार हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील हे पक्षाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून अजितदादांच्या विरोधात कोणता उमेदवार दिला जाणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगलीच तयारी सुरू केली आहे. त्यांनी स्थानिक पातळीवर भेटीगाठींचा कार्यक्रम करतानाच शेजारच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्येही लक्ष घातलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या