Baramati Result : बारामतीमध्ये अजित पवारच बॉस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा
Baramati Nagarpalika Result : पवार कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये अजित पवारच किंग असल्याचं स्पष्ट झालं. तसेच पुणे जिल्ह्यातली अजितदादांच्या राष्ट्रवादीने मोठा विजय मिळवला आहे.

पुणे : बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. बारामती नगरपालिकेच्या 41 पैकी 35 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवारच बॉस असल्याचं स्पष्ट झालं.
भलेही 288 शहरांमध्ये निवडणुका झाल्या असतील, पण सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं अशा नगरपालिका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच होत्या. त्यापैकी एक म्हणजे गेली अनेक दशकं पवार कुटुंबाचा गड राहिलेलं बारामती. अजितदादांनी आपल्या काकांचा पक्ष बारामती नगरपालिकेतून जवळजवळ संपवल्याचं दिसून आलं.
Baramati Nagarpalika Result : बारामतीमध्ये निर्विवाद यश
बारामती नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच तिथे कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. याआधी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव करत सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर विधानसभेलाही बारामतीत काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत झाली होती. त्यामध्ये अजित पवारांनी विजय मिळवत गड राखला होता. या दोन्ही निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणुकीतही दोन्ही पवारांमध्ये लढत रंगली. मात्र, त्यामध्ये अजित पवारांनी निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचं दिसून आलं.
Pune Nagarpalika Result : पुणे जिल्ह्यात अजितदादाच किंग
पुणे जिल्ह्यात आपलंच वर्चस्व असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. पुणे जिल्ह्यातील 17 नगरपरिषदा आणि नगरपालिकांपैकी 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह मविआलाही धक्का बसला आहे.
बारामतीसह, लोणावळा, दौंड, शिरूर, इंदापूर, जेजुरी, भोर, वडगाव, माळेगाव आणि उरुळी फुरसुंगीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झाले. या निकालानंतर जिल्हा कुणाच्या मागे आहे ते बघा, असं अजित पवार म्हणाले.
Maharashtra Election Result : राज्यात भाजप मोठा भाऊ
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच वरचष्मा पहायला मिळतोय. 288 पैकी 124 जागांवर भाजपाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. यामध्ये 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. फक्त नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यांत भाजपची पाटी कोरी राहिली आहे.
भाजपापाठोपाठ शिंदेंची शिवसेना निकालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शिंदेंच्या शिवसेनेचे 61 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 36 उमेदवार नगराध्यपदी विजयी झालेत. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकांमध्येही मविआला मोठा धोबीपछाड मिळाला. मविआतील तिन्ही पक्षांना मिळून 50 चा आकडाही पार करता आलेला नाही. तिन्ही पक्षांचा मिळून फक्त 47 जांगांवर विजय झाला. त्यामध्ये काँग्रेसला 27, ठाकरे सेनेला 8 तर शरद पवारांचे 12 उमेदवार नगराध्यपदी विजयी झाले आहेत.
ही बातमी वाचा:























