माळेगाव साखर कारखाना निवडणूक : राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलची बाजी
अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली आहे. 21 पैकी 16 जागांचे निकाल हाती आले असून 11 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलचा विजय निश्चित झाला आहे. कारण आतापर्यंत 21 पैकी 16 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात 11 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर पाच जागांची मतमोजणी अजून सुरु आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताब्यातून गेलेल्या कारखान्यावर पुन्हा सत्ता काबीज केली आहे.
या निकालात सत्ताधारी रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला मोठा धक्का बसला आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनलला केवळ पाच जागाच मिळाल्या. तर उर्वरित राखीव पाच जागांवर निलकंठेश्वर पॅनल चे उमेदवार आघाडीवर आहेत.
पणदरे गटातील तीनही जागा राष्ट्रवादीकडे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पणदरे गटातही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. माळेगाव गटातील दोन जागा जिंकल्यानंतर पणदरे गटातील तीनही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. या गटातून तानाजी कोकरे, केशवराव जगताप आणि योगेश जगताप हे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनलने पणदरे गटामध्ये आपली ताकद पणाला लावली होती. त्यासाठी माजी उपाध्यक्ष तानाजी कोकरे, मातब्बर उमेदवार केशव जगताप आणि योगेश जगताप या अनुभवी लोकांना या गटातून उतरवले होते.
मतमोजणीला उशीर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारी रोजी मतदान झालं. काल (24 फेब्रुवारी) या निवडणुकीची मतमोजणी होती. परंतु मतमोजणीला साडेतीन तास उशीर झाल्यामुळे रात्रभर मजमोजणीची प्रक्रिया सुरु होती. ही प्रक्रिया आज सकाळीही सुरुच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या साखर कारखान्याचे सभासद आहेत.
अजित पवारांकडून पराभवाचा वचपा खरतंर अजित पवार यांचं मागील अनेक वर्षांपासून बारामतीवर निर्विवाद सत्ता होती. परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील पराभव त्यांच्या अतिशय जिव्हारी लागला होता. त्यामुळे यंदा त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी निर्धार करत अजित पवार स्वत: मैदानात उतरले. सत्ताधारी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांना धक्का देत विजय खेचून आणला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या साखर कारखान्याचे सभासद आहेत.