Sharad pawar On Yuva Sangharsha Yatra : युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी; युवा संघर्ष यात्रेसाठी शरद पवारांकडून रोहित पवारांना भरभरुन शुभेच्छा
रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी आहे. यातुन तरुणांचे प्रश्न आणि समस्या सुटण्याचा हेतू आहे. दिंडीतून युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल, असं म्हणत शरद पवार यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा दिल्या.
पुणे : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी आहे. यातून तरुणांचे प्रश्न आणि समस्या सुटण्याचा हेतू आहे. दिंडीतून युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल. युवा संघर्ष यात्रेपूर्वी कंत्राटी भरतीचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला शुभेच्छा दिल्या. पुण्यातील टिळक स्मारकमध्ये त्यांच्या या यात्रेची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी शरद पवार बोलत होते. त्यांच्यासोबतच पवार कुटुंबातील अनेक सदस्य रोहित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी रोहित पवारांनी शरद पवारांना लढाईचं प्रतिक असलेली तलवार भेट दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, समाजकार्य करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या तरुणांच्या आशा आणि आकांक्षा प्रफुल्लीत करण्यासाठी ही मोहीत रोहित पवारांनी हाती घेतली आहे.
रोहित पवारांनी हाती घेतलेली युवा संघर्ष यात्रेची मोहिम मोठी आहे. या यात्रेतून अनेक तरुणांचे प्रश्न सुटणार आहे. त्यांच्या प्रश्नांना निदान मार्ग मिळणार आहे. यापुढे तरुणांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करु शकणार नाही. केल्यास सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे या काळात ही दिंंडी अत्यंत महत्वाची असणार आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांनी सांगितला शेतकऱ्यांच्या दिंडीचा किस्सा
या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या दिंडीचा किस्सा त्यांनी सांंगितला. ते म्हणाले की, एकदा असाच शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी विधीमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते मात्र त्यावेळी फारसं यश आलं नाही. त्यानंतर विधानसभेचं अधिवेशन होतं. या अधिवेशनात दिंडी घेऊन जायचं ठरवलं होतं. उन्हातान्हाचा विचार न करता शेतकरी एकत्र आले होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेत शेतकऱ्यांसठी मागणी करावी, असं लोकांनी ठरवलं होतं त्यानंतर जळगावपासून ते लातूर पर्यंत दिंडी काढली. त्यावेळी प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. जेवणाची कधीच कमतरता नव्हती.
शैक्षणिक संंस्थांनी भरमसाठ फी घेणं योग्य नाही...
सरकारच्या धोरणामध्ये अनेक निर्णय घेतले आहे. ती धोरणं बघितले की असे निर्णय सरकारने का घेतले?, असा प्रश्न निर्माण होत आहे. शाळा सुरु आहेत पण शाळेत शिक्षक दिसत नाही. शैक्षणिक संस्था चालवणारे काही लोक भरमसाठ फि घेतात. ही फी घेणं योग्य नाही त्यासंदर्भात सरकारने विचार करायला हवा असंही शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
Ajit Pawar : अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे घेतला निर्णय