Pune Ajit Pawar : अजितदादा पालकमंत्री झाल्याने पुण्यातील भाजप नेत्यांची अडचण होणार?
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद, अर्थमंत्रीपद आणि त्यानंतर आता पुण्याचं पालकमंत्री पद मिळवलं. पुण्याचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र आता भाजपसमोर मोठी आव्हानं उभी राहिली आहे.
पुणे : अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पद, अर्थमंत्री पद आणि त्यानंतर आता पुण्याचं (Pune) पालकमंत्री पद मिळवलं. पुण्याचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. अजित पवार आपल्या मित्रपक्षांवर दबाव टाकून आपल्याला हवं ते करण्यात पटाईत आहेत, असं म्हटलं जातं. 15 वर्षे काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या दडपशाहीचा किंवा दबाव राजकरणाचा अनुभव घेतला आता तोच अनुभव भाजपला आला. आता अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुण्यातील भाजप नेत्यांसमोर काही आव्हानं असणार आहेत.
अजित पवार पॉवर प्लेमध्ये यशस्वी...
अजित पवार सत्तेत सहभागी झाले खरे पण त्यांचे मुख्य लक्ष्य हे पुण्याच्या पालकमंत्री पदावर होते. पुणे जिल्हा हा अजित पवारांच्या राजकारणाचा पॉवर सेंटर आहे. आपल्या होम पीचवरील आपला वचक कायम राहावा यासाठी अजित पवार आग्रही होते. गेल्या काही दिवसांतल्या नाराजीच्या चर्चांमुळे अजित पवार पॉवर प्लेमध्ये यशस्वी झाले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मात्र त्यांना मिळालेल्या या पालकमंत्री पदामुळे पुण्यात भाजपसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
विकास निधीवरुन धूसफूस
पुणे जिल्ह्यातील विकास निधी हा राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला जातो, असं म्हटलं जातं. विकास निधीवरुन मागील काही दिवसांपासून धूसफूस सुरु होती. अजित पवार आपल्याच आमदारांना विकास निधी देतात आणि मतदार संघांचा विकास करतात, असं बोललं जातं. पुण्यातील अनेक मतदार संघांमध्ये अजित पवार समर्थक आमदार आहेत. या आमदारांचे विरोधक त्याच मतदार संघातील भाजपचे नेते आहेत. त्यामुळे अजित पवार गटातील या आमदारांना निधी दिला आणि त्यातून त्यांच्या मतदारसंघांमध्ये विकास कामं झाल्याचं चित्र निर्माण झालं तर याचा फटका अर्थातच भाजपच्या स्थानिक नेत्यांना येत्या निवडणुकीत बसणार आहे.
राष्ट्रवादी विरुद्ध भाजप?
मावळ मतदार संघाचं उदाहरण घेतलं तर अजित पवार समर्थक आमदार सुनिल शेळके यांना विकास निधी देण्यात आला आणि त्यातून विकास कामं होताना दिसले तर याचा भाजपच्या बाळा भेगडे यांचं राजकारण अडचणीत येणार आहे. त्यानंतर वडगावशेरी मतदार संघामध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांना निधी मिळाला तर त्याच्या विरोधात असलेले भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना अडचणी निर्माण होणार आहेत. त्यासोबतच हडपसर मतदार संघाचे अजित पवार समर्थक आमदार चेतन तुपे यांची थेट लढत योगेश टिळेकर यांच्यासोबत आहे आणि इंदापूर मतदार संघात अजित पवार समर्थक आमदार दत्तात्रय भरणे यांची लढत हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत आहे. याच प्रकारे पुण्यातील इतर मतदार संघातील भाजप नेते देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भाजप नेत्यांची चांगलीच दमछाक होणार?
अजित पवार सकाळीच कामाला सुरुवात करतात हे आपल्याला चांगलंच माहित आहे. कार्यक्रमाला कोणी उपस्थित असो किंवा नसो ते कार्यक्रमाची आणि कामाची वेळ चुकवत नाहीत. मात्र पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांसोबत आणि त्यांच्या कामासोबत जुळवून घेताना भाजप नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. शिस्तीच्या चौकटीत काम करणाऱ्या भाजप नेत्यांना अजित पवारांच्या या कार्यशैलीसोबत जुळवून घ्यावं लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका पुन्हा काबीज करणार?
पुण्याचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अजित पवार हे आता पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज करण्यासाठी तयारी सुरु करणार असल्याच्या चर्चा आहेत. मागील अनेक वर्षांपासून अजित पवारांचं पिंपरी-चिंचवड महापालिकेवर वर्चस्व होतं. मात्र भाजपकडे पालिका गेल्यामुळे वर्चस्व कमी झालं होतं. सत्तेत सहभागी झाल्यापासून अजित पवारांचे पिंपरी-चिंचवड शहरात दौरे वाढले आहेत. कार्यकर्त्यांना कामाचं स्वरुप अजित पवारांनी आखून देण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.
कोणत्या मतदार संघात भाजप आणि अजित पवार गटाची लढत...
मतदार संघ अजित पवार गट आमदार भाजप
मावळ सुनिल शेळके बाळा भेगडे
वडगावशेरी सुनिल टिंगरे जगदीश मुळीक
हडपसर चेतन तुपे योगेश टिळेकर
इंदापूर दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील
इतर महत्वाच्या बातम्या