Loksabha Election 2024 : पुण्यात उद्या राजकीय रणधुमाळी; 'बारामती'साठी पवार विरुद्ध पवार संघर्षाला धार येणार
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबतच शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
Loksabha Election 2024 : पुण्यामध्ये उद्याचा दिवस प्रचंड राजकीय धामधुमीचा असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार उद्या (18 एप्रिल) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार एकमेकींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यातील कौन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दोघींचे म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येतील.
अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर अर्ज दाखल करणार
सुप्रिया सुळे यांच्यासोबतच शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचेदेखील अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचे अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येतील.
महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून झाल्यानंतर रास्ता पेठेमध्ये शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीची प्रचार सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते याप्रसंगी उपस्थित असणार आहेत. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडी मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे.
दुसऱ्या बाजूला बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरून झाल्यानंतर महायुतीची देखील सभा होणार आहे. कॅम्पमधील ब्ल्यू नाईल चौकात ही सभा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेला उपस्थित असणार आहेत. महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज साधारणपणे सकाळी अकराच्या दरम्यान दाखल करण्यात येतील. उमेदवारी अर्ज भरताना मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत असणार आहेत. मात्र त्यानंतर होणाऱ्या सभांना मोठी गर्दी अपेक्षित आहे. कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचा आवाहन दोन्ही बाजूंकडून करण्यात आलं आहे. या निमित्ताने होणाऱ्या सभांमध्ये दोन्ही बाजूंचे नेते काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे.
इतर महत्वाच्या बातम्या