Sharad Pawar on Dilip Walse Patil : सगळं देऊन पाच टक्के सुद्धा निष्ठा पाळली नाही, धडा शिकवण्याची वेळ आली; शरद पवारांकडून मानसपुत्र दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं आवाहन
Sharad Pawar on Dilip Walse Patil : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
Sharad Pawar on Dilip Walse Patil : शरद पवारांची तोफ आज (21 फेब्रुवारी) थेट मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडली. या सभेतून वळसेंना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी शड्डू ठोकले. पवार यांनी आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांना पराभूत करण्याचे आवाहन केले. पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू. निष्ठवंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
पाच टक्केही निष्ठा पाळली नाही
शरद पवार म्हणाले की, तुमच्या तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं आहे. अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. निष्ठा ही त्यांचं वैशिष्ट्य होतं, पण आज काय पाहतो आपण? त्यांना आम्ही सगळं दिलं. विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्ष पद, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही. ते निघून गेले. असे लोक नागरिकांशी सुद्धा निष्ठा पाळणार नाहीत. त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असे सांगत मानसपुत्र दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं आवाहन केले.
सन्मानाने जगणाऱ्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
ते पुढे म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी जाहीर सभेच्या निमित्ताने आज मी तुमच्या समोर आलो आहे. आज वेगळा काळ आहे, देशात वेगळं चित्र आहे. शेतीशी इमान राखणारे आज तुम्ही सगळे समोर आहात. देशात कुठं ही गेलो तरी पाहतो, काळ्या मातीशी इमाने इतबारे असणारा शेतकरी संकटात आहे. तो घाम गाळतो, पण पिकाला रास्त भाव मिळेना. असं घडलं की शेतकरी कर्जबाजारी होतो. अशावेळी सावकार आणि बँका घरातील वस्तूही नेतात. सन्मानाने जगणाऱ्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक जाहिरात आहे. मोदींची गॅरंटी, कोणाची गॅरंटी तर मोदींची, काय गॅरंटी तर शेतीला भाव, तुमच्या मुलाला नोकरी, वगैरे वगैरे अशी गॅरंटी देतात. एकीकडे ही गॅरंटी अन दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनीही अजित पवार गटाचा समावेश घेत वळसे पाटलांवर निशाणा साधला.
इतर महत्वाच्या बातम्या