Ajit Pawar in Baramati : एक दिवस असा आणेन, बारामती राज्यात एक नंबरचा तालुका असेल, मला तुमची साथ हवी; अजित पवारांचे आवाहन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बारामतीमध्ये आज आणि उद्या 3 मार्च रोजी पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा भव्य मेळावा होत आहे.
बारामती :मी फुशारकी मारत नाही, पण बारामतीतील प्रत्येक इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत मी चाळीस- चाळीस वेळा भेटी दिल्या. करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यातील विकासकामे करताना मी मनापासून ती कामे करतो. बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा असून त्यासाठी आपली साथ हवी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमो मेळाव्यातून केले. बारामतीत 'नमो महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार दत्ता भरणे उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी केली ते सर्वजण यावेळी उपस्थित होते.
बारामती तालुका एक नंबरचा करण्यासाठी राज्यातील नेते साथ देतील
गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांनी शड्डू ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सूचक विधान केल्याची चर्चा आहे. अजित पवार म्हणाले की, बारामतीमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री आल्याने त्यांचे स्वागत करतो. मुख्यमंत्री कोकणातील कार्यक्रमासाठी गेल्याने थोडा उशीर झाला. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. नमो रोजगार विभागवार घेतला, त्याला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. बारामती तालुका एक नंबरचा करण्यासाठी राज्यातील नेते साथ देतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बारामतीमध्ये आज आणि उद्या 3 मार्च रोजी पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा भव्य मेळावा होत आहे. या मेळाव्यसाठी आजपर्यंत 347 आस्थापना सहभागी झाल्या आहेत. त्यांच्याकडून 55 हजार 72 रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत. तर आतापर्यंत 33 हजारांवर युवक-युवतींनी रोजगारासाठी नावनोंदणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेले दोन-तीन दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे. माध्यमाचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या दोन-तीन दिवसात मिळवून दिली. हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे. महारोजगार मेळाव्यात 55 हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. याचा अर्थ एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत, पण या दोघांना एकत्रित आणणारा कोणीतरी आवश्यक होतं.या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महा रोजगार मेळावा आयोजित केला. त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या