Vasant More : तरीही फणा काढतातच, पण मी बी पक्का गारुडी! शर्मिला ठाकरेंनी संकेत देताच वसंत मोरेंच्या स्टेट्सने भूवया उंचावल्या
शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना खासदारकीचे संकेत दिल्यानंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया आली आहे. काही दिवसांपूर्वीच वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे, असं शर्मिला ठाकरे यांनीच म्हटले होते.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
"कुणासाठी कितीही करा वेळ आली की फणा काढतातच"
वसंत मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवत म्हटले आहे की, "कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार." त्यामुळे वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला आहे याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना खासदारकीचे संकेत दिल्यानंतर वसंत मोरे यांची सोशल प्रतिक्रिया आली आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे, असं शर्मिला ठाकरे यांनीच म्हटले होते. आता शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमांमध्ये साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचे सांगितले.
नेमकं आता हे स्टेटस कोणासाठी असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे, पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट होते.
उद्धव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी मार्च एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होतील. ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होतील, पुढील वर्षी महापालिका निवडणूक होतील. कोरोना काळात सत्ताधारी पक्ष कोरोना काळामध्ये बंगल्यात बसून होते, अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कोरोना काळामध्ये आपल्या पक्षाने जेवढी काम केली, तेवढी कोणत्याही पक्षाने केली नसल्याचा दावा केला. तेव्हा सगळे सत्ताधारी बंगल्यात बसले होते, आमचा पक्ष रस्त्यावर होता. आमची चांगली मुलं कोरोनामध्ये दगावली असे त्यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या