(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी 'ही' तरुणी ठरली देवदूत!
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार ठप्प झाला. पुण्याच्या बुधवार पेठेतील महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी आकांक्षा सडेकर ही तरुणी देवदूत ठरली आहे.
पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यभरात निर्बंध लावण्यात आले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील व्यवहारात ठप्प आहेत. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद आहेत. अनेकांचा रोजगार देखील हिरावला गेला. पुण्याच्या बुधवार पेठेतील महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत समाजातील अनेक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संघटना या महिलांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. अशाचप्रकारे एका ब्रिटीश तरुणीने देखील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला.
आकांक्षा सडेकर असे या तरुणीचे नाव आहे. मुंबईत जन्म झाल्यानंतर ही तरुणी लहानाची मोठी स्कॉटलंडमध्ये झाली. मागील सहा वर्षांपूर्वी ती पुन्हा भारतात परतली. कोरोनाची दुसरी लाट जेव्हा सुरु झाली तेव्हा ती पुण्यात होती. यावेळी एका वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल होत असल्याची व्यथा ट्विटरवरुन मांडली होती. हे ट्वीट आकांक्षाने पाहिले आणि तिने अशाप्रकारे अडचणीत असणाऱ्यांसाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सहा हजार गरजूंपर्यंत जेवणाचे डब्बे पोहोचवल्याचे तिने सांगितले.
6000 Dabbas it is today! I am surprised how far I have come in literary two weeks time... Its been hard, Its exhausting and I have stopped picking calls post 9pm cause I need rest... If you wish to donate, link in BIO. #COVIDEmergency2021 #PleaseDonate #COVIDSecondWaveInIndia
— Aakanksha Sadekar (@scottishladki) April 28, 2021
आकांक्षाने सुरुवातीला एकटीनेच या उपक्रमाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पुण्यातील आणखी काही तरुण तिच्या मदतीसाठी पुढे आले. तेव्हापासून तिचा हा उपक्रम अद्यापही सुरुच आहे. तिच्यासोबत काम करणाऱ्या किशोर नावाच्या तरुणाने या अन्नाची वाहतूक करण्याची जबाबदारी उचलली आहे.
"सुरुवातीच्या काळात आम्ही जेव्हा गरजू व्यक्तींपर्यंत अन्न कसे पोहोचावावे याच्या विचारात होतो. तेव्हा आम्हाला भेटलेल्या पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अन्नाची गरज सर्वात जास्त असल्याचे सांगितले. कारण लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडण्यास बंदी होती. त्यामुळे बुधवार पेठेतील रस्ते ओस पडले होते. परिणामी या महिलांची उपासमार होत होती. तेव्हापासून आम्ही येथील महिलांना जेवणाचे डब्बे देण्यास सुरुवात केली. या उपक्रमाची माहिती आम्ही ट्विटरच्या माध्यमातून दिल्यानंतर अनेक स्वयंसेवक आमच्या सोबत घेऊन काम करत आहेत," असं आकांक्षाने आपल्या या उपक्रमाविषयी सांगितले.