Pune Police: अजित पवारांची लोणावळा पोलिसांना तंबी; पोलिसांनी कारवाई ऐवजी काढली जागृती रॅली
Pune Police: पुण्याचे पालकमंत्री ड्रग्स प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील लोणावळा पोलिसांवर ताशेरे ओढले होते, त्यानंतर पोलिसांनी शहरात जागृती रॅली काढली.
Pune Police: गेल्या काही दिवसात पुणे शहर परिसरात गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स प्रकरणे समोर आली होती. अशातच पुण्याचे पालकमंत्री ड्रग्स प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पुण्यातील लोणावळा पोलिसांवर ताशेरे ओढले होते, त्यानंतर जागे झाल्याचं सोंग पोलिसांनी केलं असल्याचं दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी काय केलं तर? शहरात जागृती रॅली काढली. मात्र या रॅलीतून अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
कारण अजित पवारांनी (Ajit Pawar) लोणावळ्यात अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री खुले आम कशी काय होते? पोलिसांना याची खरंच खबर नसते का? चिरीमिरी देणाऱ्यांना अभय देता आणि न देणाऱ्यांवर फक्त कारवाई कसं काय करता? असे प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी मी हे खपवून घेणार नाही. थेट तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, अशी तंबी अजित पवारांनी (Ajit Pawar) लोणावळ्यात एका कार्यक्रमादरम्यान दिली होती.
यानंतर पोलिसांनी अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आणि ज्या हॉटेलमध्ये याचं सेवन केलं जातं, अशा ठिकाणांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज होती. मात्र पोलिसांनी व्यसनमुक्तीचा संकल्प आणि सुरक्षित पर्यटन मोहीम यासाठी जनजागृती रॅलीसह पथनाट्यचे आयोजन केल्याचं दिसून येत आहे. तरुणांमध्ये ही जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी पडेल ही, पण याचं मूळ जिथं दडलंय ते उपसण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. म्हणूनच अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट पोलीसांवर ताशेरे ओढले, आता पोलिसांनी योग्य ती कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र, पोलिसांच्या या निर्णयानंतर आता पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.
काय म्हणाले होते अजित पवार?
लोणावळ्यातील परिस्थिती गंभीर होत आहे, अतिशय चुकीचे प्रकार इथं घडत आहेत. ड्रग्सचा वापर होताना दिसतोय. या नव्या पिढीला बरबाद करण्याचे, त्यांना व्यसनाधीन करण्याचे अधिकार कोणी दिलेले नाहीत. त्यामुळं मुंबईत बैठक घेऊन मी पोलिसांना याबद्दल कडक आणि कठोर कारवाईचे आदेश देणार आहे. मी पोलिसांना आज वोर्निंग देतोय, यापुढं जिथं कुठं ड्रग्सचे प्रकार आढळतील, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर मी कारवाई करणार. मी अजिबात हे खपवून घेणार नाही, गृह विभागाला सांगून मी कारवाईला करायला लावणारच. अगदी माझं हॉटेल असलं तरी तिथं कारवाई व्हायला हवी. चिरीमिरी साठी कारवाई टाळू नका. हफ्ते देणाऱ्यांवर कारवाई करणार नाही अन् हफ्ते न देणाऱ्यांवर कारवाई करणार, असं अजिबात चालणार नाही.
पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, एमडी, एमए, गांजा, चरस विक्री होते. तुम्ही सांगा होतं का हे? हात वर करा, अरे तुमच्यासाठी करतोय मी, हात वर करा, तुम्ही काय भेकड आहात की काय? हा, आता बघा इतके लोक हात वर करतायेत, म्हणजे हे घडतंय. मग पोलिसांनी हे पहावं. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही गुन्हे दाखल करा, चांगली कलमं लावा. लोणावळा सुरक्षित वाटायला हवी.