Ajit Pawar : असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
Ajit Pawar Baramati Speech Today : परप्रांतियांनी बारामतीत येऊन काही चुकीच्या गोष्टी केल्या तर बारामतीची बदनामी होते, अशांचा कायमचा बंदोबस्त करावा असे निर्देश अजित पवारांनी दिले.

बारामती : बारामतीमध्ये जर कुणी कायदा सुव्यवस्था राखणार नसेल तर त्याला योग्य तो धडा शिकवा, बारामतीची बदनामी आजिबात खपवून घेणार नाही असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. यूपी-बिहारमधून कुणीतरी येतो, आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करतो, ती मुलगीही यूपीचीच असते. यातून शेवटी बारामतीची बदनामी होते. असल्यांचा कायमचा बंदोबस्त करा असे निर्देश अजित पवारांनी पोलिसांना दिले.
बारामतीमधील तीन हत्ती चौकात 30 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.
त्यांचा कायमचा बंदोबस्त करा
अजित पवार म्हणाले की, "आपल्या इथे कामधंदाच्या निमित्ताने यूपी बिहारचे लोक येतात. आठ वर्षाच्या मुलीवर ती पण यूपीचीच, तिच्यावर एकाने बलात्कार केला. शेवटी बारामतीची बदनामी होणार. असल्याना सोडू नका, त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे."
लाईन मारायला गेला तर टायरखाली घालतो
बारामतीतील टवाळक्या करणाऱ्या तरुणांना अजित पवारांनी चांगलाच दम दिला. ते म्हणाले की, "कुणी कुठेतरी लाईन मारायला जाल तर तुझी लाईनच काढतो अन् टायर खाली घेतो. कुणालाही अजिबात कोणाला सोडणार नाही. कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे."
रात्री अपरात्री कुठे काही वेडंवाकड करू नका, चुकीचं वागू नका अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो. कुठेही पचापच थुंकू नका, घाण टाकू नका, व्यवस्थित रहा. आणखीन बारामती हिरवीगार करू, त्याला साथ द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं.
बोर्ड लावून बारामती विद्रुप करू नका
अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश अजित पवारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. ते म्हणाले की, "निकाल संभाजीनगरला होतो, तिथे सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही, हायकोर्टाचे आदेश आहेत. इथे अजित पवारचा वाढदिवस असला तर एक जरी पोस्टर लावला तरी काढायचे आणि जप्त करायचे. अजित पवारपासून सुरुवात करा. कोणाचे लाड ठेवू नका. आपले जे ऑथेंटिक बोर्ड आहेत तिथे कोणाला लावायचे आहेत तिथे लावा असं सांगा आपलं शहर विद्रूप करू नका."
Ajit Pawar Baramati Speech : अजित पवारांचे भाषण खालीलप्रमाणे,
राष्ट्रध्वज आपल्या देशाच्या स्वाभिमान-एकतेचे आणि बलिदानाचं प्रतीक आहे. महात्मा गांधी, भगतसिंग सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा ध्वज उंचावला आहे. हा राष्ट्रध्वज तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल, त्यावर फडकत राहणारा तिरंगा बारामतीच्या आकाशात उंच राहील. प्रत्येक नागरिकाला राष्ट्रप्रेमाची आठवण करून देईल. आजच्या दिवशी मिळालेल्या स्वतंत्र्याची अमूल्य देणगी जपण्याच्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने कार्य करूया. आपण समाजाशी बांधिलकी ठेवली पाहिजे.
आज डीवायएसपी सुदर्शन राठोड यांनी पोलीस खात्याची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी पार पाडली, गडचिरोली ला कार्यरत असताना नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची दखल महाराष्ट्र शासनाने महायुतीच्या सरकारने घेतली त्यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केला आहे.
या शहरात आपण या चौकाला तीन हत्ती चौक म्हणून ओळखायचो. शहरात विकास करत असताना सुधारणा करत असताना तुम्ही बारामतीकर मला मनापासून साथ देता. त्यामुळे मी बरंच काही करू शकतो, आणखी खूप करायचं आहे. बारामतीच्या वैभवात भर घालायची आहे. आपल्याला या ठिकाणचं तीन हत्ती सर्कल मोठं करायचं आहे. या तीन हत्ती चौकाच्या सर्कलला आपल्याला तिरंगा सर्कल हे नाव दिला आहे आणि आज त्याचं अनावरण केलं आहे.
कोणाच्या भावना दुखव्यात अशी भावना माझ्या मनात कधीच नसते. माझं लहानपण याच शहरात गेलं. अनेक माझे सहकारी याच शहरात लहानाचे मोठे झाले, हे शहर बदलत असताना मी लहानपणी बघितलं आहे.
1991 ला मला खासदार केलं, त्यावेळेपासून मी मागे वळून बघितलं नाही. आज सकाळी बीडला होतो, दुपारी संभाजीनगरला होतो. उद्या मी सांगली आणि कोल्हापूरला जाणार आहे. परवा जळगावला जाणार आहे.
काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात. पिंपरी चिंचवड मध्ये विकास करताना मला अनेकदा अतिक्रमणे काढावी लागली. कोणाच्या पोटावर पाय द्यावा अशी भावना माझी नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करायचे आहे, त्याबद्दलचे प्रयत्न चालू आहेत.
बारामतीमधील भाजी मंडई, त्या ठिकाणची वास्तू आकाराला येऊ पाहत आहे. आपल्या बस स्थानकाचे कौतुक देशात होतं, राज्यात होतं. परंतु तुम्ही ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. मी परवा अचानक गेलो, प्रत्येकाला झाडलं. कुठेही आलो तर कार्यकर्ते, लोक निवेदन देतात. लोकांना वाटेल की हा बारामतीत कधी येतो की नाही. काहीतरी शिस्त पाळा, प्रत्येक जण भेटेल तिथे निवेदन देतो.
आपल्या शहरात कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी. त्यात कुणाची दादागिरी, गुंडगिरी असता कामा नये. सर्वांनी शिस्तीचे पालन करावं.
मला कोणीतरी फोटो पाठवले, कोणीतरी अचानक येऊनच इथे ऑफिस काढलं. ही जागा तुमच्या घरची आहे का? ही बारामतीकरांची जागा आहे. असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता? चिप ऑफिसर अधिकारी कसे गप्प बसतात? उद्या अजित पवारच्या उजव्या हातवाल्यांनी जरी ऑफिस टाकलं तरी त्याच्यावर कारवाई करायला अजिबात मागेपुढे बघायचं नाही.
पूर्वी माळावरच्या देवीच्या ठिकाणची काय परिस्थिती होती. लाईटचे काम उभा करत असताना काही शहाण्यांनी चार नटबोल्ट पैकी तीन नट बोल्ट चोरून नेले. परकाळे बंगल्याच्या समोरच्या पुलाच्या दोन्ही बाजूला दहा दहा फुटाचे फुटपाथ केले आहेत, त्याच्या खालच्या पट्ट्या रात्री चोरीला नेल्या. नालायकांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. मी परवाच रश्मी शुक्लांना इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला सांगितलं आहे, एसपीला सुद्धा सांगितले आहे. मला बारामतीत बऱ्याचश्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहेत.
हे असली सापडले ना त्यांना मकोका लावा, त्या साल्यांना सोडू नका असा तोंडात एखादा शब्द येतो. पुन्हा तेवढेच दाखवत बसतील, दादा स्वातंत्र्यदिनी असा बोलला. बाकी केलेला आहे त्याच्यावर यांना काही घेणं देणं नाही. पण चुका केल्यावर मी कोणाची चूक सहन करणार नाही.
ट्राफिकच्या दृष्टीने दहा ठिकाणी सिग्नल बसवायचे आहेत. तुम्हाला नियम पाळावी लागतील. पूर्वीच्या काळात कसंही चालत होतं. पूर्वी बारामतीची संख्या होती 17,000 होती, ती आता लाखाच्या पुढे गेली आहे. शहरात वाहनांची संख्या 10 ते 15 पट वाढली. त्यासाठी रस्ते मोठे करत आहे. पण तुम्ही शिस्त पाळली पाहिजे.
तुम्ही पुण्याला जा, त्या फुले विद्यापीठाच्या समोरचा पूल चुकीचा झाला होता. अडीचशे कोटीचं नुकसान झालं. मी रात्रीतून पूल पाडून टाकला. आता तिथे नवीन सोय केली. जर मागच्या लोकांनी चुकीच्या गोष्टी केल्या तर दुरुस्ती करायची नाही का? मी उद्याच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करतोय. तुम्ही साथ देताय म्हणून मी करतोय.
काय काय जण उपोषणाला बसलेत, अजून मी बिगवन चौकातील स्तंभाचा विचार केला नाही. चर्चा करायला या ना माझ्याशी. उद्याच्या काळात काही गोष्टी चांगल्या दृष्टिकोनातून करत असतील तर भावनेचा मुद्दा कशाला निर्माण करतात. आम्हाला भावना श्रद्धा नाही का ?आम्हाला वाटतं का आमची लोक वाऱ्यावर सोडून द्यावीत.



















