(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Politics: पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, कट्टर वैरी एकत्र येणार; अजित पवार-सुरेश कलमाडी एकाच मंचावर बसणार
Pune Politics: अनेक वर्षांचं राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार आणि सुरेश कलमाडी आज एकत्र येणार आहेत. पुणे फेस्टीव्हलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हस्ते उद्धाटन पार पडणार आहे.
पुणे: अनेक वर्षांच राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार (Ajit Pawar) आणि सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) आज एकत्र येणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली आहे. पुणे फेस्टीव्हलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हस्ते उद्धाटन होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात 15 वर्षं एकत्र सत्ता असतानाही पुण्यात मात्र काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) आणि राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते होते.
एकमेकांना शह देण्यासाठी या दोघांनी स्थानिक पातळीवर कधी भाजप तर कधी शिवसेनेसोबत आघाड्या केल्या होत्या. या संघर्षातून पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar) कधीच कलमाडींनी सुरू केलेल्या पुणे फेस्टीव्हलच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत. मात्र आता 36व्या पुणे फेस्टीव्हलच्या उद्घाटनाला अजित पवार (Ajit Pawar) सपत्नीक उपस्थित राहणार आहेत.
माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुण्यात या पुणे फेस्टिवलची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून अजित पवार आजपर्यंत या कार्यक्रमात गेले नव्हते. त्यामुळे यंदा पुणे फेस्टिवलचे उद्घाटन त्यांच्या हाताने होणार असल्याने सुरेश कलमाडी आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, सुरेश कलमाडी हे प्रकृती ठीक नसल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही याबद्दल अद्यापही माहिती समोर आलेली नाही.
पुणे फेस्टिव्हल'ची 36व्या पुणे फेस्टीव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (13 सप्टेंबर) दुपारी 4:30 वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज यांचीही उपस्थिती राहणार आहे.