Ajit Pawar In pune: लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवार संतापले
आता मंत्रिमंडळ विस्तार लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे.
Ajit Pawar In pune: मंत्रिमंडळ विस्तार करा, पालकमंत्री ठरवा असं आम्ही वारंवार सांगत आहोत. यामुळं प्रशासन चालवताना अडचणी येत आहे. माझ्याकडे विरोधीपक्ष नेते म्हणून अकरावीचे विद्यार्थी मागण्या करतायेत. विज्ञान शाखेला त्यांना प्रवेश मिळत नाहीयेत, या अडचणी सोडविणार कोण? यासाठी आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटतोय. त्यांच्याकडे अधिवेशन घेण्याची मागणी करतोय. आता मंत्रिमंडळ विस्तार लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर असताना काहींना भेटायला दवाखान्यात गेले होते. 10 वाजेनंतर ते दवाखान्यात गेले होते. त्यावेळी तिथं घोषणाबाजी सुरू होती. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काही बोलले नाहीत. आता मुख्यमंत्री स्वतःच रात्री दहा नंतरची धनिक्षेपकाचे नियम पाळत नसतील तर अवघड आहे, असंही म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.
महाराष्ट्रातील सरकार दिल्लीहून चालत आहे. त्यामुळे दिल्लीतील आदेशाशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणताच निर्णय घेऊ शकत नाही आहे. या दोघांच्या हातात आता काहीच उरलं नाही आहे, दिल्लीवारी केल्याशिवाय आपलं राज्य सरकार चालू शकत नाही. म्हणून मुख्यमंत्री सारखे दिल्लीला जात आहेत, असंही ते म्हणाले
भंडारामध्ये महिलेबाबत जी घडली, तशी मावळमध्ये एका मुलीबद्दल घडली. मी आज तिथं भेट देणार आहे. शेजारीच राहणाऱ्या तरुणाने घृणास्पद अत्याचार केले. त्या नराधमाने नंतर त्या मुलीचा गळा चिरला आणि त्या नराधमाच्या आईने ही मदत केली. ती आई सुद्धा पीडित कुटुंबाकडे जाऊन बसायची. हे काय घडतंय? आता याकडे बघायचं कोणी? पोलीस त्यांचं काम करत आहेत. पण राज्य सरकार म्हणून कोण पाहणार? म्हणूनच आम्ही म्हणतोय मंत्रिमंडळ विस्तार करा, अशा भाषेत त्यांनी संताप व्यक्त केला.
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारे कोण होते. हे त्यांनीच शोधायला पाहिजे. आता सरकार तुमचे, पोलीस तुमचे मग यामागचा सूत्रधार शोधा. घडलेला हा भ्याड प्रकार आहे. असे घडायला नको होतं. महाराष्ट्राला शोभत नाही. यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले तर त्यांच्यावर ही कारवाई करा, असंही म्हणत त्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.