Pune News: काय सांगता! विसर्जन मिरवणुकीला पुणेकर चप्पल तुटेपर्यंत नाचले, कचऱ्यात सहा टेम्पोभरून चपलाच चपला
मिरवणुकीनंतर 32 टन कचरा जमा झाला. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या 1 हजार 37 कर्मचाऱ्यांनी पुणे परिसराची स्वच्छता केली. यात पुणेकरांच्या चपला आणि बुटांनी देखील तब्बल सहा टेम्पो भरले.
Pune News: पुण्यातील (Pune) गणपती विसर्जन मिरवणूक यंदा तीस तास सुरु होती. दोन वर्षांनी झालेल्या या मिरवणुकीत पुणेकरांनी जल्लोष साजरा केला. हजारो पुणेकर रात्रभर रस्त्यांवर होती. गणेश विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, लाल बहादूर शास्त्री रोड, कर्वे रोड, जंगली महाराज रोड मार्गे निघाली त्या सगळ्या रस्त्यांवर फक्त लोकंच दिसत होती. याच मिरवणुकीनंतर मात्र 32 टन कचरा जमा झाला. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या 1 हजार 37 कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीन तासांत पुणे परिसराची स्वच्छता केली. यात फक्त कचराच नाही तर पुणेकरांच्या चपला आणि बुटांनी देखील तब्बल सहा टेम्पो भरले.
पुणेकर अनवानी पायानंच घरी परतले
विसर्जन मिरवणुकीनंतर पुण्यातील रस्ते साफ करण्याला सुरुवात झाली. तीस तास सलग हजारो लोकं रस्त्यांवर बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले होते. हजारो लोकांनी यंदा मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली होती. अनेकांना फोटो काढायचे होते तर अनेक लोक उत्साहाने नाचण्यासाठी सहभागी झाले होते. अलका टॉकीज चौकात माणसांचा पूर आला होता. मात्र याच मिरवणुकीनंतर अनेक पुणेकर अनवानी पायानेच घरी गेले कारण दुसऱ्या दिवशी शहराची स्वच्छता करताना चपला आणि बुटांनी तब्बल सहा टेम्पो भरले होते.
ठिकठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसू लागल्याने घनकचरा विभागाने स्वच्छता मोहिम हाती घेतली. यासाठी महापालिकेचे 1 हजार 37 सफाई कर्मचारी होते. यात अनेक संस्थांचा देखील समावेश होता. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यात लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, टिळक चौक, खंडूजी बाबा चौक, कर्वे रोड, जंगली महाराज रोड, सेनापती बापट रोड, गणेशखिंड रोड, गोपाळ कृष्ण गोखले रोड, हुह. प्रभात रोड, भांडारकर रोड, पुणे मुंबई रोड मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आले.
कोल्हापूरातही सापडल्या चपला
कोल्हापूरातील (kolhapur) मिरवणुक पार पडल्यानंतर सगळीकडे शांतता होती. शहराच्या साफसफाईचं काम सुरु असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात कोल्हापूरातील महाद्वारावर 6 डंपर चपला सापडल्या. यंदा गणेशोत्सव नागरीकांनी चांगलाच जोरात साजरा केला हे यावरुन स्पष्ट होतं. मात्र पुण्याप्रमाणे कोल्हापूरकरही मिरवणुकीनंतर अनवानी पायांनी घरी परतले.