Sharad Pawar: विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी सांगितलं उमेदवार निवडीचं राजकारण
Sharad Pawar: महाविकास आघाडीने देखील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील तिन पक्ष एकत्रित लढत आहेत. या अनुषंगाने तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अशातच पक्ष आपापल्या परिण सर्व प्रयत्न करत आहेत, सभा बैठका, पक्षांतर, जागावाटप या घडामोडींना वेग आला आहे. अशातच महाविकास आघाडीने देखील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील तिन पक्ष एकत्रित लढत आहेत. योग्य उमेदवार ठरवण्यासाठी या तीन पक्षांकडून या नेत्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे संजय राऊत या कमिटीत असतील. हे तिन्ही नेते कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतील. येत्या दहा दिवसात त्यांचा अहवाल ही समिती देणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरच्या आत पार पडतील, अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. या कमिटीमध्ये जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे. जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो उमेदवार इच्छुक आहे, त्याला काही विचारलं जाणार नाही. तर गावातील सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध
भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास शरद पवारांच्या पक्षाची तुंतारी फुंकतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनक दिवसांपासून सुरू आहेत. अशातच या मुद्द्यांवरून इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. आयात उमेदवाराला संधी देऊ नका, अशी मागणी त्यांनी यावेळी केल्याची माहिती आहे.
शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्यानंतर दशरथ माने यांनी तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून येईल, आपण चुकीचा निर्णय घेऊ नका अशी विनंती यावेळी केली. तर आप्पासाहेब जगदाळे यांनी सहा जण उमेदवार आहेत कुणालाही उमेदवारी द्या, ज्यांनी ज्यांनी ताईंना विरोध केला आहे त्यांना आम्ही घरी बसवू असा विश्वाय यावेळी व्यक्त केला आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
तर कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शरद पवार (Sharad Pawar) बोलताना म्हणाले, महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण आहे. लोकसभेला वेगळं चित्र होतं. प्रधानमंत्री सांगत होते 400 च्या वर जागा येतील. पाच वर्षपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसचा एक आला. राष्ट्रवादीने 10 जागा लढल्या त्यातील 8 आल्या. लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते. म्हणून आपल्याला यश मिळाले. नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठरवले होते.1 लाख 58 हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली.
ही निवडणूक 3 लोकं एकत्र येऊन लढणार आहेत. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाणार आहे. इच्छुक उमेदवाराला विचारायचे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटत विचारले जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी शरद पवारांनी दिली.