Sangali Logistics Park: सांगलीजवळ लॉजिस्टीक पार्क उभारणार, त्यामध्ये एअर स्ट्रीप, विमाने उतरणार; गडकरींची घोषणा
सांगली जिल्ह्यातील राजनी येथे मोठा लॉजिस्टीक पार्क उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये एअर स्ट्रीपचादेखील समावेश असेल याचा सांगलीला फायदा होऊ शकेल, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
Sangali Logistics Park: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी जर पुणे विभागात हायवेच्या बाजूला जागा दिली तर काही ठिकाणी लॉजिस्टीक पार्क उभारणार आहे. सांगलीजवळ उभारण्यासाठी जास्त प्रयत्न सुरु आहे. पुणे-बंगलोर या नियोजित ग्रीन फिल्ड हायवेवर सांगली जिल्ह्यातील राजनी येथे मोठा लॉजिस्टीक पार्क उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये एअर स्ट्रीपचादेखील समावेश असेल याचा सांगलीला फायदा होऊ शकेल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी केली आहे. त्यांनी पुण्यात ही घोषणा केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील (pune) वाहतूकीचा प्रश्न (traffic) सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी पुण्याच्या वाहतूकीचा मेगा प्लॅनही जाहीर केला. त्यासोबतच सांगलीतील लॉजिस्टीक पार्कची घोषणा देखील केली.
पुणे-बंगलोर या नियोजित ग्रीन फिल्ड हायवेवर हा लॉजिस्टीक पार्क असणार आहे. हा ग्रीन फिल्ड हायवे वारवे बुद्रुकपासून सुरू होणार आहे. या मार्गाला सहा लेन असणार आहे. संपूर्ण रस्ता डांबरी आहे. सिमेंटचा वापर होणार नाही आहे. हा मार्ग सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट जाणार नाही. टोल स्टेशनपासून जवळच्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता असेल. वाहतूक विस्कळीत न होता आपत्कालीन परिस्थितीत विमान थेट महामार्गावर उतरवण्यासाठी पुणे आणि बंगळुरूजवळ पाच किमीचा विमान धाव पट्टी असेल. प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 31,000 कोटी रुपये आहे. याच हायवेवर सांगली जिल्ह्यातील राजनी येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. याचा फायदा सांगली, सातारा आणि कोल्हापूर या शहरांना होणार आहे.
लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय?
लॉजिस्टिक पार्कची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते.पार्कमध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात. कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग, प्लॅन्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक आपसूक कमी होईल. यामुळे शहरातील वाहतूक आणि शहराचं प्रदूषणही कमी होण्यास मदत होते.
कसा असेल हा ग्रीनफिल्ड हायवे
ग्रीनफिल्ड हायवे हा पूर्णपणे नवीन एक्सप्रेस वे असणार आहे. त्यात जुना रस्ता रुंदीकरणाचा समावेश नाही. ताशी 120 किमी वेगाने वाहने धावतील. चार, सहा आणि आठ थर आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत.