Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांनी मनसे पक्षाला पाठिंबा न देता मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढत होत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एकला चलो रे चा नारा दिलाय. त्यातच आता नाशिकमध्ये (Nashik News) मुस्लीम बांधवांनी मनसे पक्षाला पाठिंबा न देता मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात (Nashik West Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीतून भाजपने (BJP) विद्यमान आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिनकर पाटील (Dinkar Patil) यांना उमेदवारी दिली आहे. तिन्ही नेत्यांकडून या मतदारसंघात जोरदार प्रचार केला जात आहे. सर्व उमेदवार मतदारांना भेटून आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच आता मनसेचे (MNS) उमेदवार दिनकर पाटील यांची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.
मनसे पक्षाला नव्हे तर, उमेदवारास पाठिंबा
नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील (Nashik West Assembly Constituency) मुस्लीम बांधवांनी अनोखा निर्णय घेतला आहे. मनसे पक्षाला पाठिंबा न देता उमेदवार दिनकर पाटील यांना मुस्लीम बांधवांनी पाठिंबा जाहीर केलाय. नाशिक पश्चिम मतदारसंघातील पांडवलेणी परिसरात असलेल्या एका दर्ग्यात दिनकर पाटील यांनी मुस्लीम बांधवांची भेट घेतली. यावेळी आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा देत नाही तर दिनकर पाटील या व्यक्तीला पाठिंबा दिला आहे, अशी भूमिका मुस्लीम बांधवांनी घेतली. यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिनकर पाटील यांना बळ मिळणार असल्याची चर्चा आता रंगत आहे. आता या मतदारसंघात सुधाकर बडगुजर की सीमा हिरे की दिनकर पाटील? नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या