Coronavirus | सर्व धर्मियांचे 114 अंत्यविधी पार पाडणारा नेता, असंवेदनशील राजकारण्यांना चपराक देणारं कार्य
पुण्याच्या मंचरचे सरपंच असताना गावातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. नातेवाईक देखील मृतदेहाला स्पर्श करत नव्हते तेंव्हा गांजाळेंनी तो अंत्यविधी पार पाडला. तेव्हापासून हाती घेतलेला वसा त्यांनी मागे टाकलाच नाही.
पिंपरी- चिंचवड : संवेदनशीलता, माणुसकी हरवलेले राजकारण काय असते हे कोरोना काळात महाराष्ट्राने बघितले आहे. कोरोनाला घेऊन राजकीय नेत्यांची अनास्था खूपच लाजिरवाणी आहे. पुण्याच्या मंचर मधील शिवसेनेचा एक नेता मात्र याला अपवाद ठरलाय. या नेत्याने सर्व धर्मियांच्या अंत्यविधीचा जणू वसाच हाती घेतला आहे. आत्तापर्यंत सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 114 मृतदेहांचे सर्व विधी स्वतः पार पाडले आहेत. त्यांचं हे कार्य सर्व राजकारण्यांना जणू एक चपराक आहे.
बुरसटलेल्या राजकारणात समाजकारण करणारे, माणुसकी जपणारे शिवसेनेचे नेते दत्ता गांजाळे. पुण्याच्या मंचरचे सरपंच असताना गावातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. नातेवाईक देखील मृतदेहाला स्पर्श करत नव्हते तेंव्हा गांजाळेंनी तो अंत्यविधी पार पाडला. तेव्हापासून हाती घेतलेला वसा त्यांनी मागे टाकलाच नाही. गांजाळे सरपंच होते तेंव्हा त्यांनी 56 आणि त्यानंतर 58 असे आत्तापर्यंत 114 अंत्यविधी पार पाडले आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांविना हे कार्य शक्यच नव्हतं. गांजाळेंनी या कार्यात धर्म, जात या सर्व विचारांना ही भेदलं आहे. म्हणूनच सर्व धर्मीय त्यांना देवदूत म्हणतात.
एकीकडे कोरोना रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरू आहे तर दुसरीकडे सरकार सत्ता टिकविण्यासाठी आणि विरोधक सत्ता मिळविण्यासाठी वाट्टेल ते राजकारण करण्यात व्यस्त आहे. अशात दत्ता गांजाळेंनी रक्तापलीकडचं नातं जपून एक आदर्श घडविला आहे. यातून या असंवेदनशील राजकारण्यांनी धडा घेतला पाहिजे.